| न्यु यॉर्क | वृत्तसंस्था |
फॅफ ड्यू प्लेसिसच्या वादळी शतकाच्या जोरावर टेक्सास सुपर किंग्स संघाने मेजर लीग क्रिकेटमध्ये सोमवारी एमआय न्यू यॉर्क संघावर दणदणीत विजयाची नोंद केली आहे. 40 वर्षीय फॅफने एमआय न्यू यॉर्क संघातील गोलंदाजांची धुलाई करताना शतक झळकावले आणि अनेक विक्रमांना गवसणी घातली.
यावेळी सुपर किंग्सच्या डावाची सुरुवात करताना फॅफने 53 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 9 षटकार खेचून 14 चेंडूंत 74 धावा कुटल्या सुपर किंग्जने 20 षटकांत 4 फलंदाज गमावून 223 धावा केल्या. डोनोव्हन फरेराने 53 धावांची वादळी खेळी केली. मुंबईच्या संघाला 20 षटकांत 9 बाद 184 धावाच करता आल्या. मुंबईच्या संघाकडून किरॉन पोलार्डने 39 चेंडूंत 70 धावांची खेळी केली. टेक्सास सुपर किंग्जने हा सामना 39 धावांनी जिंकला.
दरम्यान, फॅफचे हे टी-20 कारकिर्दीतील 8 वे शतक ठरले. या शतकासह तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकांवर पोहोचला आहे. त्याने या बाबतीत मायकेल क्लिंगर, आरोन फिंच, जॉस बटलर, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांची बरोबरी केली आहे. या सर्व खेळाडूंनी प्रत्येकी 8 शतके केली आहेत. त्याचबरोबर एमआय न्यू यॉर्क विरुद्ध फॅफची नाबाद 103 धावांची खेळी ही मेजर लीग मधील त्याची तिसरी शतकी खेळी ठरली. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणारा तो फलंदाज आहे. टी-20 इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या कर्णधाराचा मानही फॅफने पटकावला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लिंगर आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांचा 7 शतकांचा विक्रम मोडला आहे.