26 कोटींच्या वसुलीसाठी एमआयडीसीची मोहीम
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. या 19 ग्रामपंचायतीकडे मार्च 2022 अखेर 26 कोटी 34 लाख 59 हजार 713 रुपये इतकी थकबाकी आहे. यामध्ये ज्या ग्रामपंचयातीचे पाणी सध्या बंद असले तरी त्यांच्या थकबाकी धरल्यास ही थकबाकी 32 कोटींच्या घरात आहे.
या वाढत्या थकबाकीमुळे एमआयडीसीच्या उरणमधील विकासकामानाही खीळ बसली असून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये आर्थिकदृष्टया सधन समजल्या जाणार्या ग्रामपंचायतींचा ही समावेश आहे. तसेच नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करूनही ती भरली जात नाही.
उरण तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि 26 ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणीपुरवठयाची देयके भरण्याची तत्परता मोजक्या काही ग्रामपंचायतीवगळता ग्रामपंचायतीकडून दाखवली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींकडील पाणी देयकांची थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्याकाठी आणि दरवर्षी वाढतच चालला आहे. 2019 मध्ये तालुक्यातील या ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची 27 कोटी 11 लाख 16 हजार 067 थकबाकी होती. या थकबाकीदारांमध्ये नवीन शेवा 1 कोटी 09 लाख 17 हजार 592, हनुमान कोळीवाडा 36 लाख 55 हजार 490, करळ 81 लाख 49 हजार 551, धुतुम 1 कोटी 17 लाख 81 हजार 942, जसखार 1 कोटी 72 लाख 76 हजार 397, बोकडवीरा 2 कोटी 49 हजार 713, फुंडे 2 कोटी 87 लाख 69 हजार 277, सावरखार 48 लाख 74 हजार 232, डोंगरी 55 लाख 9 हजार 211, सोनारी 1 कोटी 34 लाख 66 हजार 896, नागाव 1 कोटी 29 लाख 17 हजार 735, चाणजे 7 कोटी 69 लाख 25 हजार 36, पाणजे 2 लाख 99 हजार 581, चिर्ले 2 कोटी 10 लाख 80 हजार 121, केगाव 1 कोटी 92 लाख 59 हजार 768, म्हातवली 83 लाख 46 हजार 92, तेलीपाडा 01 लाख 65 हजार 220 आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या थकबाकीदारांमध्ये जेएनपीटी हद्दीतील नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, डोंगरी, जसखार, सोनारी, करळ, सावरखार,बोकडवीरा या नऊ तर ओएनजीसी हद्दीतील नागाव, म्हातवली, चाणजे या तीन अशा एकूण आर्थिकदृष्टया सधन म्हणून ओळखल्या जाणार्या 12 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
चिरनेर कनेक्शन, खोपटा कनेक्शन, दिघोडे, दादरपाडा, वेश्वी, रांजणपाडा, नवघर, पागोटे आदी विभागांकडेही सुमारे साडेपाच कोटी रूपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जमेस धरल्यास एमआयडीसीची पाणी बिलाची थकबाकी 32 कोटींच्या जवळपास आहे. या आठ ग्रामपंचायतींना मागील 3 ते 4 वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींना सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. जासई, भेंडखळ, बालई व तेलिपाडा यांची देयके नियमित भरली जात असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.
वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटिसाही बजावण्यात येत आहेत. मात्र त्यानंतरही थकबाकीदार ग्रामपंचायतींकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यात टाळाटाळ केली जात आहे. ग्राममपंचायतींकडे असलेल्या कोटयवधींची असलेल्या थकबाकीमुळे मात्र एमआयडीसीच्या विकासकामांना खीळ बसली आहे.
रवींद्र चौधरी, उरण उपअभियंता