टेम्पो चालकावर जुजबी कारवाई
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड पोलिसांनी दि. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान एकदरा पुलाजवळ एक पिकअप टेम्पो क्रमांक एमएच 46 बीएम 6713 मुद्देमालासह पकडला. या टेम्पोमध्ये 30 मोठ्या बॅटऱ्या पोलिसांना सापडल्या आहेत. हा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टेम्पोचालक इम्तियाज अब्दुला शेख याच्यावर जुजबी कार्यवाही करण्यात आल्याचा आक्षेप ग्रामस्थ नयन दीनानाथ आंबटकर यांनी घेतला आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगण्यासाठी त्यांनी नुकतीच पत्रकारांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, 22 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता विजय सागर या नौकेमधून राजपुरी येथील बबन शेगजी, नरेंद्र घागरी, विलास मोंनाक, विलास कुणबी यांना मी बोटींमधून प्रत्यक्ष माल उतरवताना पाहिले आहे. बोटींमधून त्यांनी बॅटऱ्या व तांबे उतरवले व टेम्पोमध्ये हा माल भरला. मी हे दृश्य पहाताच क्षणी मुरुड पोलिसांना यांची त्वरित खबर दिली. तद्नंतर मुरुड पोलिसांनी हा टेम्पो एकदरा पुलाजवळ पकडला व ताब्यात घेतला.
मुरुड पोलिसांनी या प्रकरणात फक्त चालकावर जुजबी कार्यवाही केली; परंतु ज्यांना मी स्वतः माल उतरवताना पहिले त्यांची चौकशी पोलीसी खाक्या दाखवून केली असती ते या चोरीचा उलगडा झाला असता. परंतु मुरुड पोलीस फक्त चालकावर कार्यवाही करून हा तपास गुंडाळू पाहात आहेत, असा आरोप श्री. आंबटकर यांनी केला आहे. चोरीचा माल कोठून आणला याचा तपास लावण्यात त्यांना कोणतेही स्वारस्य दिसत नाही. पोलीस फक्त बॅटऱ्या सापडल्या दाखवत आहेत, मग यातील तांबे कोठे गेले याचासुद्धा शोध लावणे आवश्यक आहे, अशी मागणी श्री. आंबटकर यांनी केली आहे.
मुरुड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यावर मी स्वतः पोलीस निरीक्षक निशा जाधव यांची भेट घेतली तेव्हा मी विचारणा केली की, सदरची चोरी असून मी पाहिलेल्या व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी मला सांगितले कि, ज्या व्यक्तीचा माल चोरीस गेला आहे त्याने फिर्याद नोंदवली पाहिजे होती. परंतु या प्रकरणात तसे घडलेले नाही, असे सांगितले. काही दिवसांपूर्वी समुद्रकिनारी चरसची पाकिटे सापडली; परंतु ही पाकिटे कोठून आली याचा तपास पोलिसांना करता आलेला नाही. आता 30 बॅटऱ्या सापडल्या आहेत, त्याचा तपाससुद्धा अधांतरीत राहणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.