एसटीच्या ‘स्मार्ट’ योजनेत बिघाड; कार्डअभावी ज्येष्ठांचे हाल

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. परंतु, एसटीच्या दीर्घ संपानंतर या योजनेत अनेक त्रुटी आढळून येत असून, स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी लागणारी यंत्रणा (थम्ब इम्प्रेशन) अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे.

पासष्ट वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना सुरु केल्याने ज्येष्ठ नागरिकांना साध्या बसचा प्रवास 50 टक्के तिकीट दरात व शिवशाही बसचा प्रवास 45 टक्के दरामध्ये करता येतो. या सवलतीच्या दरांमुळे सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांना मोठाच दिलासा मिळाला आहे. कामगारांच्या दीर्घकालीन संपानंतर नुकतीच एस.टी. सेवा सर्वत्र सुरु झाली आहे. परंतु, स्मार्ट कार्ड योजनेच्या संदर्भात अजून काही त्रुटी आढळून येत आहेत. त्यातील महत्त्वाची त्रुटी म्हणजे काही आगारांमध्ये स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी लागणारी यंत्रणा (थम्ब इम्प्रेशन) अद्यापही उपलब्ध नाही.

श्रीवर्धन स्थानकावर साधारण एक आठवड्यापूर्वी चौकशी केली असता तेथेही ही यंत्रणा संपानंतर पुन्हा कार्यान्वित झालेली नाही असे समजले. जरी जुन्या स्मार्ट कार्डधारकांना त्यांच्याकडे असलेल्या जुन्या कार्डाच्या आधारेच प्रवास करण्याची सुविधा महामंडळाने उपलब्ध करुन दिली असली तरी ज्यांना नव्याने या योजनेचे कार्ड काढायचे असेल त्यांची नवीन कार्ड्स काढण्याची यंत्रणाच सुरु नसल्यामुळे मोठीच गैरसोय झाली आहे. तरी महामंडळाने या प्रश्‍नात त्वरित लक्ष घालून ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Exit mobile version