तटकरेंना धोबीपछाड देणार; अनंत गीतेंना विश्‍वास

| रायगड | खास प्रतिनिधी |

लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कितीही जणांनी अर्ज भरले तरी मतदारांचा कौल माझ्याच बाजूने राहील. मला पाठीमागून खंजीर खुपसण्याची सवय नाही. मी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मैदानात धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी व्यक्त केला.

अलिबाग-वेश्‍वी येथे गीते यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. तटकरे यांनी बॅरिस्टर ए.आर. अंतुले, शरद पवार, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसच्या शिंदे गटाच्या नेत्यांना फसवले आहे. त्यांनी जनतेची वेळोवेळी फसवणूक केली आहे, त्यामुळे खंजीर खुपसण्याची सवय माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये नाही, असा घणाघात गीते यांनी केला. 2019 च्या निवडणुकीत मी तटकरे यांना हद्दपार करणार होतो; परंतु आमदार जयंत पाटील यांनी त्यांना वाचवले. परंतु, आता आमदार जयंत पाटील यांनीच तटकरे यांना निवडणुकीतून हद्दपार करण्याचे ठरवले आहे, त्यामुळे विजय हा आपलाच आहे, असेही ते म्हणाले.



भाजपाच्या फडणवीस यांनी देशातील राजकारण नासवले आहे. 105 आमदार निवडून आलेले असतानाही त्यांना सत्तेबाहेर राहावे लागले म्हणूनच त्यांनी शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. त्यांची सत्तेची भूक अद्यापही थांबलेली नाही. त्यांनी मिळवलेली सत्ता शेतकरी, कष्टकरी, युवा, कामगार, महिला यांच्यासाठी नसून, स्वतःसाठी आहे. त्यांची सत्तेची भूक थांबणार कधी? त्यांना भास्म्या झाला असून, हे आधुनिक बकासुर आहेत, असा टोला लगावला. देशातील जनता आता मोदी यांच्या धोरणांना कंटाळली आहे. आता मोदीविरोधी त्सुनामी आली आहे, असेही ते म्हणाले.राष्ट्रहितासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून मोठ्या संख्येने मला विजयी करा, असे आवाहन गीते यांनी केले. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे, त्यामुळे तटकरे यांना निवडणुकीत गाडून टाका, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, श्रद्धा ठाकूर, राजा ठाकूर, सतीश लोंढे, योगेश मगर, प्रदीप नाईक, प्रफुल्ल पाटील, अ‍ॅड. मानसी म्हात्रे, दत्ता ढवळे, संजय पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version