पोलिस शिपाई सिद्धेश पाटील जेरबंद
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
गडचिरोली येथे नुकतीच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत काही उमेदवारांनी खोटे प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र दिल्याबाबतचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई सिद्धेश पाटील याने हे बोगस दाखले दिले असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी अलिबाग येथे येऊन सिद्धेश पाटील याला अटक करून नेले आहे. त्यामुळे राज्यात असे किती जणांना सिद्धेश याने त्याच्या साथीदाराच्या सोबतीने दाखले दिले याचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या 2023 च्या पोलीस भरती दरम्यान काही उमेदवार प्रकल्पग्रस्ताचे बोगस सर्टिफिकेट घेऊन भरती करता आले होते. अशी माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गडचिरोली पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला याबाबत तपास करण्यास सांगितले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे विभागाने तपास करून त्या भरतीच्या उमेदवाराविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बोगस प्रमाणपत्र गुन्ह्याच्या तपासादरम्यान आतापर्यंत सात आरोपी गडचिरोली पोलिसांनी अटक केले आहेत. अटक असलेल्या आरोपीकडे केलेल्या चौकशी दरम्यान तपास अधिकारी यांना रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई सिद्धेश पाटील, नेमणूक पोलीस मुख्यालय प्रतिनियुक्ती- पैरवी अधिकारी, अलिबाग, जिल्हा न्यायालय याने संबंधित भरतीच्या उमेदवारांना प्रकल्पाग्रस्तांचे बोगस सर्टिफिकेट दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गडचिरोली पोलीस दलातील एक पथक शुक्रवारी तपासाकरता अलिबाग येथे आली होते.
गडचिरोली येथून आलेल्या पथकाने रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक याच्या आदेशाने पोलीस शिपाई सिद्धेश पाटील याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या उमेदवारांना त्याचा साथीदार देशमुख रा. सांगली याच्या मदतीने प्रकल्पातग्रस्ताचे बोगस सर्टिफिकेट बीड जिल्ह्यातून आणून दिल्याचे कबूल केले आहे. त्यानंतर पोलीस शिपाई सिद्धेश पाटील याला गडचिरोली पोलिसांच्याकडे पुढील चौकशी करता देण्यात आले आहे.