। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मालदोली, भिले, भोम आणि कालुस्ते या चार सोसायट्यांमध्ये सुमारे 55 लाखांच्या अपहारप्रकरणी चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतानाच काही सभासदांच्या नावे बनावट कर्ज प्रकरणे केल्याचा धक्कादायक प्रकारही पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील बनावट कर्जाची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.
तालुक्यातील खाडीपट्ट्यातील भिले, भोम, कालुस्ते आणि मालदोली या चारही विविध सहकारी सोसायट्यांमध्ये मोठ्या स्वरूपात उलाढाल होते. या सोसायट्यामध्ये सभासद संख्याही मोठी आहे; परंतु आता या सहकारी सोसायट्यामधील 55 लाखांची रक्कम सचिवाने वैयक्तिक कारणासाठी वापरल्याची लेखी कबुली सहाय्यक निबंधकांच्या चौकशीत दिली आहे. अजूनही या प्रकरणी चौकशी सुरू आहे; मात्र या चारही सोसायट्यांचे दप्तर गायब असल्याने चौकशीत अडचणी येऊ लागल्या आहेत. या चार गावांमधील शेतकर्यांना खावटी कर्जासाठी तसेच बी-बियाणे, खते, अवजारे, जनावरे व अन्य खरेदीसाठी सोसायटीमार्फत कर्ज दिले आहे; मात्र यातील काही कर्जे बनावट असल्याची चर्चा सुरू आहे.
ज्या शेतकर्यांना कर्जाची आवश्यकता आहे अशांकडून तो कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे घ्यायचा. त्याचवेळी बँकेतून पैसे काढण्यासाठीच्या स्लिपवरदेखील तो संबंधित व्यक्तीकडून सह्या घ्यायचा. त्या आधारे बँकेत कागदपत्रे जमा करून रक्कम काढली जायची. संबंधित लोकांनी कर्जाची विचारणा केल्यास नामंजूर झाल्याचे सांगितले जायचे. यामध्ये बँकेतील काही अधिकार्यांचीही साथ असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही सभासदांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची रक्कम तातडीने अदा केल्याची माहितीदेखील उपलब्ध झाली आहे.







