50 हजारांचे दागिने घेऊन चोरटे फरार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। पाली/वाघोशी । प्रतिनिधी ।
पाली शहरात बनावट पोलिसांच्या नावाखाली गुन्हेगारी थैमान वाढले आहे. नुकत्याच घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राम आळी परिसरात दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करत 69 वर्षीय वृद्ध महिलेला गंडा घालत तब्बल 50,000 रु. किमतीचे सोन्याचे दागिने बेमालूम लंपास केले.
प्रांजली सचिन कुलकर्णी (वय 69, रा. राम आळी, पाली) या पायी चालत असताना काळ्या मोटारसायकलवर दोन इसम आले. त्यापैकी एकाने पांढरा शर्ट व काळी पॅन्ट, तर दुसऱ्याने खाकी कपडे घालून पोलीस असल्याचा आव आणला. तसेच दागिने घालून फिरू नका, चोरी होईल, असे सांगून त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दागिने पिशवीत ठेवण्यास भाग पाडले आणि दागिने घेऊन फरार झाले.
या प्रकारात महिलेचे दीड तोळ्याची सोन्याची चेन व दोन बेंटेक्स बांगड्या असा अंदाजे 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
