मुबंईत बनावट लस प्रकरण उघड

मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून बाहेर पडत असलेल्या मुंबईत आता लसीकरण घोटाळे होऊ लागले आहे.कांदिवलीती हिरानंदांनी हाऊसिंग सोसायटीमध्ये बोगस शिबीर घेण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्यानंतर अशाच स्वरूपाची शिबीर इतर ठिकाणी झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत काही जणांना अटक केली आहे. दरम्यान, हिरानंदानी सोसायटीतील रहिवाशांना देण्यात आलेली लस खरी असून शिबिरासाठी वापरण्यात आलेले लसींचे डोस गुजरातमधील दमण आणि दीव येथे पाठवले जाणार होते, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिका प्रशासनानं दिली आहे.

कांदिवलीतील हिरानंदानी हाऊसिंग सोसायटीमध्ये लसीकरण शिबीर घेण्यात आलं होतं. मात्र, कोविशिल्ड लस घेतल्यानंतर नागरिकांना कोणताही मेसेज आला नाही. तसेच लक्षणंही दिसली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर हा लसीकरण घोटाळा समोर आला होता. लसीकरण शिबिरात नागरिकांना लस देण्यात आली की आणखी काही, याबद्दलची माहिती घेण्यासाठी मुंबई महापालिकेनं सीरम इन्स्टीट्यूटकडे माहिती मागितली होती. शिबिरात वापरण्यात आलेल्या लसी इन्स्टिट्यूटकडून कोणत्या रुग्णालयाला देण्यात आल्या होत्या, अशी विचारणाही महापालिकेनं केलेली होती.

यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटने महापालिकेला माहिती दिली आहे. शिबिरासाठी वापरण्यात आलेल्या लसी गुजरातमधील दमण आणि दीवला पाठवल्या जाणार होत्या, अशी माहिती आता समोर आली आहे. मुंबई महापालिकेनं ही माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे. जर लसीचे डोस एखाद्या रुग्णालयाला देण्यात आलेले असेल, आणि त्या रुग्णालयाने हे डोस हिरानंदानी सोसायटीतील शिबिरासाठी दिले का याची चौकशी केली जाईल. हे जर झालं नाही, तर आरोपींना लसीचे डोस कसे मिळालेत याचा तपास पोलीस करतील, महापालिकेच्या अधिकार्‍यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version