श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व श्री गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्यावर खोटे आरोप

| सोगाव | वार्ताहर | नाशिक मधील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व श्री परमपुज्य गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे यांची बेकायदेशीररित्या बदनामी केल्याबाबत व सेवेकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ङाॅ.किरण शेटे (कोकण विभाग प्रशासकीय प्रतिनिधी-गुरुपीठ त्र्यंबकेश्वर) तसेच चोंढी केंद्र शाखेचे सेवेकरी रविंद्र पाटील, डॉ.अर्चना शेटे, पिंट्या प्रसाद गायकवाड यांनी गुरूवारी (दि.१९ मे) अनेक सेवेकाऱ्यांच्यावतीने रायगड पोलीस अधीक्षक यांना संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी,यासाठी निवेदन देण्यात आले.

दिंडोरीप्रणीत सेवा परिवारातील सेवेकरी हे शेती व व्यापारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. श्री स्वामी समर्थ मार्गाचे काम हे श्री परमपुज्य मोरे दादा व त्यानंतर सर्व सेवेकऱ्यांचे आधारस्तंभ असलेले आदरणीय परमपुज्य गूरू माऊली हे सुमारे ७४ वर्षापासून अविरतपणे चालु आहे. सदरील कामकाज हे अत्यंत पारदर्शकपणाने चालते. सदरील न्यास हा कायदेशीररित्या त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असून त्याचे कामकाज हे कायदेशीररित्या पारदर्शकपणे लोकभिमुखपणे चालविले जाते. सदरील संस्थेचे सामाजिक, अध्यात्मिक, धार्मिक स्तरावर लोकहिताची कामे केली जातात. तसेच श्री स्वामी समर्थ मार्गाचे शेती विषयक जनजगारण व मार्गदर्शनही केले जाते व त्यासाठी श्री आदरणीय परमपुज्य गूरूमाऊली हे भारतभर नव्हे तर जगभर लोक प्रबोधनासाठी मेळावे घेत असतात.

श्री स्वामी समर्थ मार्गासाठी लाखो सेवेकरी जोडलेले असून सदरील सेवा मार्गास आदरणीय परमपुज्य गुरूमाऊली यांनी व्यापक स्वरूप देवून देशात व विदेशात शेकडो सेवा केंद्र उभारलेली आहेत व सदरील सेवा केंद्रांमध्ये बालसंस्कार, युवा प्रबोधन, स्वयंरोजगार, विना हुंडा सामुहिक विवाह, प्रश्नोत्तर सेवा, व्यसन मुक्ती, शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव व शेतकरी सत्संग मेळावे, दुष्काळात गुरांना चारा, पाण्याच्या
टाक्यांचे वाटप, गरीब व गरजू आदिवासींना कपडे, धान्य वाटप, आरोग्य शिबीर माध्यमातून मानव रोगमुक्त करणे, प्रबोधनाकरीता ग्रंथ निर्मिती, गोधन संरक्षणाकरीता गो शाळा, वेद विज्ञान संशोधनाद्वारे संस्कृतीचे जतन अशा अनेक लोक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. तसेच श्री स्वामी समर्थ मार्गाने कोविड काळात लाखो गरजूंना अन्नदान तसेच महाराष्ट्र शासनास सेवेकरी निवास कॉरन्टाईन सेंटर करीता निशुल्क उपलब्ध करून देण्यात आले. अशा प्रकारे शासनासही मदत करण्याची व शासनाची कामे करण्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम मार्गामार्फत केले जाते.
श्री स्वामी समर्थ परिवार सामाजिक, अध्यात्मिक, धार्मिक स्तरावर लोक हिताचे काम करत आहे व सदरील मार्गाचे काम हे अखंड अविरतपणे चालु आहे. असे असतांना अमर रघुनाथ पाटील, शिवाजी नगर, पुणे. आणि चंद्रकांत गणपत पाठक, रा. त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक, यांनी कोणत्याही प्रकारे कायदेशीर बाबींचा विचार न करता बेकायदेशीररीत्या वैयक्तिक स्वार्थापोटी खोटे-नाटे अर्ज करून व खोट्या-नाट्या अर्जावरून काही प्रसिद्धी माध्यमामध्ये श्री स्वामी समर्थ गुरुपीठात ५० कोटींचा अपहार झाल्याबाबत व आदिवासींच्या जमीनींबाबत व बांधकामाबाबत जे बेकायदेशीर वक्तव्ये केलेली आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे सत्यता नाही. या सदरील वक्तव्यांमुळे श्री स्वामी समर्थ भक्त परिवारामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असून भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत व त्यामुळे सर्व सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले आदरणीय परमपुज्य गुरूमाऊली यांची बदनामी करून चुकीचा संदेश समाजात परसरवण्याचे चुकीचे कृत्य वरील लोक करीत आहेत, त्याला लगाम घालणे गरजेचे आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये सदरील वर नमुद लोकांनी जी वक्तव्ये केलेली आहेत ती वक्तव्ये निरर्थक व चुकीची तसेच बिनबुडाची असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही.

परमपुज्य गुरूमाऊली व दिंडोरीप्रणीत मार्ग याची बदनामी करून चुकीचा संदेश जनमानसात पसरवून सेवेकऱ्यांमध्ये व समाजात तणाव निर्माण करण्याचा चुकीचा प्रयत्न झालेला आहे व सोशल मिडीयाचा गैरवापर झालेला आहे, त्याचा विचार करून वरील लोकांविरूद्ध फौजदारी स्वरूपाची व कायदेशीर स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्व सेवेकऱ्यांकडुन केली जात आहे.

Exit mobile version