अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई ५५ लिटर शुद्ध पाणी पुरविण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, कार्यक्रमाची जनजागृती प्रचार प्रसिध्दी एलईडी व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या व्हॅनचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गुरुवारी (दि.२३) हिरवा झेंडा दाखवून केले. व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने सन २०१९ पासून सर्व राज्यांमध्ये जलजीवन मिशन अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जलजीवन योजने अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हा जलजीवन मिशनचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने राज्यामध्ये अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ९० दिवसांची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
यानुसार जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रा) कार्यक्रमांच्या प्रचार प्रसिद्धी करिताचे संदेश एलईडी व्हॅनव्दारे प्रसारित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन यांनी अंगल ऐडकंटायझिंग, पुणे यांना नियुक्त केले आहे. या एजन्सीमार्फत एलईडी व्हॅनव्दारे जिल्हयांतील १५ तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीमध्ये पाणी व स्वच्छता विषयांबाबत जनजागृती होणार आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीमधील शाळा बाजाराची ठिकाणे या एलईडी व्हॅनव्दारे जनजागृती करणार आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत योजनेची प्रचार प्रसिद्धी व्हॅन चे उद्घाटन प्रसंगी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, सिप्ला कंपनी सीएसआर प्रतिनिधी उल्का धुरी, पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, रविकिरण गायकवाड, सुरेश पाटील, सुनील माळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.