तिघांचे मृतदेह सापडले; दोघे बेपत्ता
| मुंबई | प्रतिनिधी |
गुजरातमधील सूरत जिल्ह्याच्या बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळून जाणाऱ्या कालव्यात महाराष्ट्रातील एका कुटुंबाला जिवंत फेकल्याची अत्यंत क्रूर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आई-वडिलांसह एका मुलीचा मृतदेह कालव्यात आढळला, तर 13 वर्षीय मुलगा चमत्कारिकरीत्या बचावला आहे. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असून, आणखी दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि एरंडोल येथील एका कारखान्यात काम करणारे हे कुटुंब 21 तारखेला मजुरीसाठी कारने सूरतला निघाले होते. कुटुंबाची कार बारडोलीतील उवा कालव्याजवळ पोहोचताच, दुसऱ्या एका कारमधून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी कुटुंबातील सदस्यांना कारमधून बाहेर काढून कालव्याच्या खोल पाण्यात फेकल्याचा आरोप आहे. कालव्यात फेकण्यात आलेल्या सदस्यांपैकी 13 वर्षीय मुलाच्या हाताला पाण्यात एक पाईप लागला. त्याचा आधार घेत त्याने जीव वाचवला आणि कालव्याबाहेर येण्यात यश मिळवले. त्यानंतर तो जवळच्या एका हॉटेलमध्ये पोहोचला. तिथे त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कालव्यात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरात उकाई-काकरापारच्या कालव्यात तीन मृतदेह आढळले. यामध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका मुलीचा समावेश होता. कुटुंबीयांनी मृतदेहांची ओळख पटवली. मृत वडिलांची ओळख नितीन ऊर्फ भुरिया पाटील अशी, तर महिलेची ओळख कविता पाटील अशी झाली. या घटनेतील आणखी दोन मुले अद्याप बेपत्ता असून, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, कुटुंबातील सदस्यांना कालव्यात फेकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खंडिया, आबो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीसह एकूण चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, सूरत ग्रामीण पोलिसांनी हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या रहस्यमय घटनेचा छडा लावण्यासाठी, आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि बेपत्ता असलेल्या दोन मुलांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी आठ स्वतंत्र पथके तयार केली असून, सखोल तपास सुरू केला आहे.
