भरकटलेली महिला व चिमुकला बाजारपेठेत सापडले
। उरण । प्रतिनिधी ।
कौटुंबिक वादातून घर सोडून निघालेली महिला व तिचा दहा वर्षांचा मुलगा उरण बाजारपेठेत भरकटलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एक हृदयस्पर्शी प्रकार समोर आला आहे. मात्र, उरण पोलिसांच्या तत्परतेमुळे व ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेमुळे ही घटना सुखद शेवटाकडे वळली आहे.
उरण पोलीस शुक्रवारी (दि. 23) ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत गस्त घालत असताना, उरण बाजारपेठेत आशिया परवीन कलाम हुसेन (32) व तिचा मुलगा फैजान कलाम हुसेन (10) हे दोघे संशयास्पद व भरकटलेल्या अवस्थेत आढळून आले. तत्काळ त्यांना उरण पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत धक्कादायक वास्तव समोर आले. कौटुंबिक वादातून कोणालाही न सांगता घर सोडून निघालेली ही महिला, पती नोकरीनिमित्त बंगलोर येथे असल्याने त्यांच्याकडे जाण्याच्या उद्देशाने निघाली होती. मात्र, चुकीची ट्रेन पकडल्याने ती थेट उरणमध्ये येऊन भरकटली.
उरण पोलिसांनी या महिलेला विश्वासात घेऊन तिच्या पतीशी संपर्क साधला. बंगलोर येथे कामानिमित्त असलेले कलाम हुसेन वजीर हुसेन यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर मिसिंग प्रकरणातील महिलेचा भाऊ गया सुदिन आयूब अली अन्सारी हा उरण पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस निरीक्षक राहुल कटवानी यांच्या उपस्थितीत सदर महिला व तिचा मुलगा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या भावाच्या ताब्यात सुरक्षितरित्या देण्यात आले. तसेच, झारखंड येथील संबंधित पोलीस ठाण्यातील तपासी अधिकाऱ्यांनाही बेपत्ता व्यक्ती सापडल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात उरण पोलिसांची संवेदनशीलता, सतर्कता आणि मानवी दृष्टिकोन पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, ‘ऑपरेशन मुस्कान’ ही केवळ मोहिम नसून हरवलेली माणसे आणि नाती परत जोडणारी आशेची किरण असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.







