| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागामध्ये शिकत असलेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये महाविद्यालयातील इतिहास विभागात पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी या समारंभामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गीते हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेंचे पूजन करून झाली.
याप्रसंगी इतिहास विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मागील तीन वर्षे महाविद्यालयात असलेला सहवास आता थांबणार म्हणून अनेक विद्यार्थी भावुक झाले. आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी इतिहास विभागाचे, महाविद्यालयाचे, आणि पीएनपी संस्थेचे आभार मानले. त्यानंतर इतिहास विभागाचे प्रा. साईनाथ पाटील आणि प्रा. मिलिंद घाडगे यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गबाजी गीते यांनी आपल्या मार्गदर्शनामधून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी आपल्या स्वलिखित कवितेमधून विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे, प्रा. पूजा पाटील तसेच महाविद्यालयातील इतिहास विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य झावरे आणि विपुल माळी या इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले.






