रस्ता गायब झाल्याने गणेशभक्तांचे हाल
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहरातील आणि नगरपंचायत हद्दीतील मोर्बा मार्गाजवळील गोंद नदी पुलाखालील गणेश विसर्जन घाट दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे. परंतु, हा घाट न झाल्याने मोर्बा रोड आणि खांदाड आदिवासीवाडी येथील गणेशभक्तांना नदीजवळील पात्रात जाण्यासाठी आणि गणपती विसर्जन करताना तारेवरची कसरत करावी लागली. प्रसंगी जीव धोक्यात घालून धोकादायक खडकाळ आणि मातीच्या ढिगार्यावरुन एकमेकांना धरून आणि सावरुन नदी पात्रात जावे लागत होते.
याच अडथळ्यातून वाट काढत खांदाड आदिवासी वाडीतील गणपती बाप्पांच्या मूर्ती जीवापाड जपत विसर्जन करताना धोका पत्करून जावे लागत होते. विसर्जन ठिकाणी कचर्याचे मोठ मोठे ढिगारे साचले होते. त्यामुळे दुर्गंधी येत होती. याबाबत वारंवार तक्रार करूनही कचर्याचे टोपली दाखवली आहे. तसेच साफसफाईदेखील केली नव्हती. दरवर्षी येथील सफाई केली जात होती. निदान यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात तरी येथील स्वच्छता राखणे आवश्यक होते. परंतु, नगर पंचायतीकडून अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पूर्वी येथे बर्यापैकी पायवाट होती. मात्र, या पायवाटेवरच माती आणि कचर्याचे ढिगारे साचले असून, दुर्गंधी येत आहे. या ढिगार्यांमुळे रस्ता अदृश्य झाला आहे. गणेशभक्तांनी झाडा झुडुपांमधून वाट काढत जीव धोक्यात घालून गणपती बाप्पांचे विसर्जन केले. तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी नेहमीप्रमाणे हजर नव्हते. पोलीसही दिसले नाहीत. कोणतीही सुविधा केलेली नव्हती. जीव संरक्षक आणि पट्टीचे पोहणारे उपलब्ध नव्हते. निर्माल्य जमा करण्याची सोय करण्यात आली नव्हती. गोद नदीच्या दोन्ही बाजूचे पात्र दुथडी भरून वाहत होते. सुर्दैवाने कोणतीही दुर्दैवी घटना गणपती बाप्पांच्या कृपेने घडली नाही. लवकर हा घाट झाला नाही तर येथील गणेशभक्तांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.