25 हजार 551 गणेशमूतींचे विसर्जन
| अलिबाग | प्रतिनिधी |
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात, साश्रुनयनांनी रायगड जिल्ह्यातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. जवळपास 25 हजारांहून अधिक दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. तलाव, समुद्रकिनारे, नद्यांमध्ये विसर्जन सोहळा पार पडला.
बुधवारी (दि.27) वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झाले हाते. जिल्ह्यात एक लाख दोन हजार 484 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गुरुवारी (दि. 28) दीड दिवसाच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. तलाव, समुद्र, नद्यांमध्ये 25 हजार 551 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत टाळ-मृदुंगासह बेंजोच्या तालावर नाचत विसर्जन ठिकाणापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. बाप्पा आल्यावर जितका आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता, तितकेच दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देतानाचे दुःखही चेहऱ्यावर दिसत होते. बाप्पाच्या विसर्जनावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून सतर्कतेच्या दृष्टीने रायगड पोलिसांकडून सुरक्षेच्या बाबतीत खबरदारी घेण्यात आली होती. दरम्यान, अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने समुद्रकिनारी साफसफाई करण्यात येऊन विसर्जनास येणाऱ्या भाविकांच्या मदतीसाठी मदत केंद्र उभारण्यात आले होते.
दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला निरोप देण्याची तयारी गुरुवारी दुपारपासून सुरु झाली. सायंकाळी पाचनंतर डोक्यावर गणेशमूर्ती घेत बेंजोच्या वाद्यांबरोबरच भजन करीत नदी, तलावांच्या किनाऱ्यापर्यंत मिरवणूक गावे, वाड्यांमधून काढण्यात आली. विसर्जन स्थळावर पोहोचल्यावर सामूहिक आरती घेण्यात आली. नदी व तलावांमध्ये गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी गावांतील तरुणांनी स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावली. शहरातून सायंकाळी पाचनंतर मिरवणूक काढण्यात आली. अलिबागसह काशीद, वरसोली, मुरूड, रेवदंडा, नागाव, थेरोंडो, किहाम, नागाव, श्रीवर्धन आदी समुद्र किनाऱ्यांवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यामध्ये एकूण 25 हजार 551 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 12 व घरगुती 25 हजार 539 गणेशमूर्तींचा समावेश होता. जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करण्यात आला.
कृत्रिम तलावात विसर्जन करण्याला पसंती
गणेशमुर्ती विसर्जन करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेच्या मार्फत समुद्रकिनारी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. दीड दिवसांच्या 70 हून अधिक गणेशमुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. भाविकांना कृत्रिम तलावात मुर्तींचे विसर्जन करण्याला अधिक पसंती दिली. तसेच स्वच्छता राखण्यासाठी निर्माल्य संकलन कलश किनारी ठेवण्यात आले. भाविकांनी फुले व इतर निर्माल्य कलशामध्ये टाकण्यावर भर दिला.
मदत केंद्रासह आरती स्थळाची उभारणी
अलिबाग नगरपरिषदेमार्फत समुद्रकिनारी मदत केंद्र व आरती स्थळाची उभारणी करण्यात आली आहे. दीड दिवसांच्या गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यासाठी समुद्रकिनारी आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मदत केंद्र सुरु करण्यात आले असून किनारी गर्दी होऊ नये म्हणून आरती स्थळही उभे केले होते.
सुरक्षेसाठी बॉम्बशोधक पथकामार्फत तपासणी
अलिबाग व समुद्रकिनारी गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. या गर्दीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रायगड पोलिसांमार्फत सकाळी दोन्ही समुद्रकिनारी बॉम्ब शोधक पथकामार्फत तपासणी करण्यात आली. तसेच श्वान पथकामार्फत देखील किनारी सर्व परिसराची तपासणी केली.












