नेरळ पोलीस ठाण्याच्या बाप्पाला निरोप

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ पोलीस ठाण्यामधील गणेशाचे अकराव्या दिवशी पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत जल्लोषात विसर्जन करण्यात आले. पाऊस प्रचंड प्रमाणात कोसळत असताना पोलीस आणि भाविक यांनी कोणतीही तमा न बाळगता विसर्जन मिरवणुकीत जल्लोष केला आणि मागील महिनाभरातील बंदोबस्तामुळे आलेला थकवा घालवला.

पोलिसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रथ सजविण्यात आला होता, तर विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व भक्तांना फेटे बांधण्यात आले होते, सोबतीला ढोल ताशा पथक होते. नेरळ पोलीस ठाणे हद्दी मधील पोलीस पाटील, शांतता कमिटी सदस्य, वारकरी, महिला मंडळ, भजनी मंडळ यांच्या उपस्थितीने पोलिसांच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठी गर्दी होती. बाप्पाच्या मिरवणुकीत जिल्हा पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांच्या उपस्थितीत शिस्तबध्द मिरवणूक निघाली.

तब्बल तीन तासांनी पोलिसांच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक गणेश घाट येथे पोहचली. त्यावेळी नेरळ ग्रामपंचायत कडून पोलीस निरीक्षक आणि प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांचे स्वागत करण्यात आले. नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर यांच्या हस्ते पोलिसांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. रात्री सव्वा नऊ वाजता पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे नेरळ येथील ब्रिटिशकालीन धरणात विसर्जन करण्यात आले.

Exit mobile version