वाजत-गाजत दहा दिवसाच्या बाप्पाला निरोप


| अलिबाग | प्रतिनिधी |
दहा दिवसाच्या उत्साहानंतर जड अंतः करणाने गुरुवारी रायगड जिल्ह्यात बाप्पाला निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात 17 हजार 543 मुर्तींचे विसर्जन झाले. त्यात घरगुती एक हजार 7393 व सार्वजनिक 150 गणेशमुर्तीचा समावेश आहे. गणपती बाप्पा मोरया … पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा देत आरती, पुजा करीत नदी, तलाव, व समुद्रात मुर्तींचे विसर्जन केले. यावेळी गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांच्या आलोट गर्दीबरोबरच वरूणराजानेदेखील हजेरी लावली.

गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना 19 सप्टेंबर रोजी झाली होती.गेली दहा दिवस बाप्पाची मनोभावे पुजा करण्यात आली. जिल्ह्यातील काही भागांमध्ये मंडळाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून जनजागृती करण्याचा प्रयत्न आला आहे. त्यात झाडे लावा झाडे जगवा, मुलगी शिकली प्रगती झाली असे अनेक संदेश उपक्रमातून देण्यात आले. तसेच काही मंडळामार्फत चंद्रयान, देशभक्तीचे देखावे उभे करण्यात आले. लोकगीत असलेले बाल्या नृत्यांचे सादरीकरण भजन, किर्तनदेखील या कालावधीत करण्यात आले.त्यामुळे दहा दिवस वातावरण भक्तीमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. दहा दिवसाच्या बाप्पाला गुरुवारी ( दि. 28) रोजी वाजत गाजत निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरासह पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत दुपारी चारनंतर जिल्ह्यातील अलिबागसह अनेक भागात मिरवणूक काढण्यात आली. दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरु झाल्याने भक्तांच्या आनंदात खंड पडण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र त्यावर मात करीत भर पावसात भिजत भाविकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. काहीजण छत्रीचा अधार घेत तर काहीजण भर पावसात भिजत मिरवणुकीत सामील झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. काही ठिकाणी सायंकाळी साडेसहा, तरकाही ठिकाणी रात्री अकरा तर काही ठिकाणी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गणेशुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

पोलिसांचा कडेकोट पहाराला
अनंत चतुर्दशीनिमित्त दहा दिवसाच्या गणेशमुर्तींचे विसर्जन आनंदात व शांततेत व्हावे यासाठी रायगड पोलीसांनी ग्रामीण भागासह शहरी भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अपर पोलीस अधीक्षक, नऊ पोलीस उपविभागीय अधिकारी, 26 पोलीस निरीक्षक, 132 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, एक हजार 334 पोलीस अंमलदार, दोन आरसीपी, एक अतिशिघ्र कृती दल, सात स्ट्रायकींग फोर्स, 265 होमगार्ड, व दोन राज्य राखीव पोलीस दलाचे पथक तैनात करण्यात आले होते. गर्दीमध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी साध्या वेशात पोलीस नागरिकांमध्ये सामील झाले होते. महिलांची छेडछाड करणारे, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांनी नजर ठेवली होती.

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अलिबागमध्ये चक्रीपध्दत
अलिबागमधील समुद्रात गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी अलिबाग नगरपरिषद व अलिबाग पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. समुद्रकिनारी मदत केंद्र उभे केले होते. विसर्जनाच्यावेळी समुद्रात जाणाऱ्या भाविकांना तसेच अति उत्साहीपणा करणाऱ्यांना वारंवार नगरपरिषद व पोलिसांमार्फत सुचना दिली जात होती. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अलिबाग पोलीसांनी समुद्राकडे येताना बालाजी नाका ते समुद्रकिनारा त्यानंतर विसर्जन झाल्यावर समुद्रकिनारा, जुनी बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा चक्री पध्दतीचे नियोजन केले.

Exit mobile version