मंगलमय व आनंदमय वातावरणात मिरवणूका
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला… गणपती बाप्पा मोरया… असा भावपूर्ण जयघोष करीत मंगळवारी सायंकाळी बाप्पासह गौराईला वाजत गाजत निरोप देण्यात आला. तलाव, नदी, समुद्र तसेच कृत्रिम तलाव अशा एकूण पाचशेहून अधिक ठिकाणी 72 हजार हून अधिक मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. सात दिवसांच्या पाहूणचारानंतर बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. ढोल ताशांच्या गजरासह बेंजोच्या वाद्याने मिरवणूक काढण्यात आली.त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुमदूमून गेला होता.
जिल्हयामध्ये बुधवारी (दि.27) गणरायाचे आगमन झाले. त्यानंतर रविवारी (दि. 31) गौराचे स्वागत घरोघरी करण्यात आले. या कालावधीत दिवसरात्र वेगवेगळे कार्यक्रम घेऊन बाप्पासह गौराईची सेवा करण्यात आले. आरती, भजनासह पारंपारिक नृत्याने शहरी भागासह ग्रामीण भाग बहरून गेला होता. सात दिवसांच्या पाहूणचारानंतर मंगळवारी (दि.2) दुपारनंतर गौराईसह बाप्पाला निरोप देण्याची वेळ सुरु झाली. संध्याकाळची आरती झाल्यानंतर गावागावातून मिरवणूकीला सुरुवात झाली. काही ठिकाणी बेंजोसह काही ठिकाणी डिजे, स्पीकर अशा अनेक वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. काही ठिकाणी गणपतीच्या गाणी तर काही ठिकाणी मराठी, हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर नाचत अनेकांनी मिरवणूकीत सहभाग घेतला. त्यासोबत भजनांचा जल्लोषही दिसून आला. काही ठिकाणी पारंपारिक पध्दतीने डोक्यावर तर काही ठिकाणी कार, रिक्षा, हातगाडीवरून बाप्पाच्या मुर्तींची मिरवणूक विसर्जन स्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत महिला, तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक, आदी सर्वचजण नवनवीन कपडे परिधान करून आनंदोत्सवात सहभागी झाले होते. रंगबेरंगी फटाक्यांची आतषबाजी तसेच एक, दोन,तीन, चार गणपतीचा जयजयकार असा जयघोष करण्यात आला.
मिरवणूकीच्या दरम्यान पावसाने सुरुवात केली होती. परंतु काही वेळ विश्रांती घेतल्याने भाविकांना थोडासा दिलासा मिळाला. ग्रामीण भागात काही ठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नदी, तलावांमध्ये गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर काही ठिकाणी रात्री दहा नंतर विसर्जन केले. शहरी भागातदेखील रात्री बारा वाजेपर्यंत मुर्तींचे विसर्जन करून गणरायाला निरोप दिला. जिल्ह्यामध्ये 56 हजार 468 गणेशमूर्ती व 16 हजार 175 गौराईची मुर्तीचे विसर्जन तलाव, नदी, कृत्रिम तलाव व समुद्रात करण्यात आले. यावेळी भाविकांनी विसर्जन स्थळांवर अलोट गर्दी केली होती. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दामीनी पथक, बीट मार्शल पथक व साध्या गणवेशातील पोलीस तैनात करण्यात आले होते.
लहान मुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात
अलिबाग नगरपरिषदेबरोबरच जिल्ह्यातील 28 हून अधिक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. कृत्रिम तलावाच्या उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी लहान मुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करून या उपक्रमात सहभाग घेतला.







