सरत्या वर्षाला दणक्यात निरोप

। पनवेल । प्रतिनिधी ।

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पनवेलकर सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सर्वत्र दणक्यात सुरू असून खवय्यांना विविध पदार्थांचे मेजवानी चाखायला मिळणार आहे. यासाठीचे नियोजन आत्तापासूनच सुरू असून एखाद्या उत्सवाप्रमाणे नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष चालणार आहे. नववर्ष स्वागताचा उत्साह लक्षात घेता शहरातील हॉटेल चालकांकडून चोख नियोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी पाटर्यांचे नियोजन केले जात असून संगीत, लज्जतदार पदार्थ तसेच विविध शीतपेये चाखण्याची संधी मिळणार आहे. तर हॉटेलमध्ये विशेष मेन्यू तयार करण्यात आला आहे. यामध्ये चमचमीत, तिखट खाद्यपदार्थ यांच्यासह गोडधोड पदार्थांची मेजवाणी खवय्यांसाठी असणार आहे.

नेहमीप्रमाणे यंदाही हॉटेल्स, रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये पाटर्यांसाठी पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर, मद्यविक्री करणार्‍या वाइन शॉपींना मध्यरात्री एकपर्यंत परवानगी असणार आहे. त्यामुळे बेकायदा मद्य तस्करीचे प्रकार रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच, मद्यपींकडे परवाना नसेल तर अशा तळिरांमावर गुन्हे दाखल होणार आहेत.

नवीन वर्षांत नवीन संकल्प
दरवषीप्रमाणे यंदाही कळंबोलीमध्ये शेकापचे माजी नगरसेवक गोपाळ भगत यांनी ‘चला, व्यसनांना बदनाम करूया’, ‘द दारूचा नाही, द दुधाचा’ मोहीम राबवणार आहेत. रविवारी (दि.31) सायंकाळी पाच ते सात यावेळी पोलिस निवारा चौकात दूध वाटप होणार आहे. कामोठा येथील श्रीयोग साधना केंद्राच्या शिक्षिका जयश्री सुद्रिक यांनी योगातून आध्यात्मिक अनुभूती मिळवण्यासाठी पनवेलच्या ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी मोफत योग प्रशिक्षण देताना नवीन वर्षात सुदृढ आरोग्याचा संकल्प केला आहे.
घाटावरील बोकडाच्या मटणाला पसंती
नववर्षाचे स्वागत करताना रविवार असल्याने खवय्यांनी मांसाहाराचे बेत आखले आहेत. चिकनाबरोबरच मटणाच्या दुकानासमोर चांगलीच रांग दिसणार आहे. गावठी घाटावरील आणि ताजे बोकडाचे मटण मिळण्याची ख्याती असलेल्या पनवेल परिसरातील काही दुकानांत फलटण, सांगोला, आटपाडी, दहिवडी, लोणंद या ठिकाणाहून बोकड विक्रीसाठी आणले गेले आहेत. तसेच, दर्जेदार मटण मिळत असल्याने या दिवशी मटणाचे दर हे 700 ते 800 रूपये किलोच्या घरात जाणार आहेत.

नवीन वर्ष स्वागताच्या जल्लोषात तरुणाई स्टंटबाजी करणे, मोठ्या प्रमाणात दारू पिऊन अरेरावी करणे प्रकार होतात. त्यामुळे अतिप्रमाणात मद्यप्राशन करणार्‍यांचे नवीन वर्ष तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. तसेच, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नागरिकांनी 112 टोल-फ्री क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा.

पंकज डहाणे, पोलिस उप-आयुक्त, पनवेल झोन-2
Exit mobile version