शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान

तळा कृषी विभागाकडून दोन लाखाचा निधी वर्ग

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातली सुतारवाडी येथील शेतकरी प्रतीक नंदकुमार सुतार (29) यांचे 20 एप्रिल रोजी कसारा येथे रस्ते अपघात झाला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले परंतू त्यांनी उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यांचे निधन झाले. घरातील तरुण व कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबावर संकट कोसळले. या अपघाताबाबत कृषी पर्यवेक्षक सुनील गोसावी यांना माहिती मिळाल्यावर अपघातग्रस्त कुटूंबाची भेट घेऊन त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना विषयी मार्गदर्शन करुन कागदपत्रांची पूर्तता करण्याच सांगितले.

सुतार यांचे वारस म्हणून त्यांचे वडील नंदकुमार सुतार यांचे नावे प्रस्ताव तयार करुन 21 ऑगस्ट रोजी मा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय समितीने त्वरित मंजूर केला व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे अनुदान मागणी करण्यात आली होती. त्यामुसार 17 ऑक्टोबर रोजी वारसदार यांच्या बँक खात्यामध्ये दोन लाख रुपयांचा निधी कृषी विभागाकडून वर्ग करण्यात आला आहे. अडचणीच्या वेळी शासनाकडून मदत झाल्यामुळे त्यांचे वडील नंदकुमार सुतार यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. शेतकऱ्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा अपघाती घटना घडल्यास कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले आहे.

Exit mobile version