शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग पंचायत समिती येथे सोमवारी (दि. 29 जून) ‘फार्मर कप 2026′ स्पर्धेचा डिजिटल शुभारंभ उत्साहात पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अलिबाग पंचायत समितीत दाखविण्यात आले. या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतीतील नवकल्पना, उत्पादकता वाढ, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धेची उद्दिष्टे, नोंदणी प्रक्रिया आणि सहभागाचे निकष याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी तथा कृषी उपसंचालक प्रवीण थिंगळे, तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत, कृषी अधिकारी राजेश घरत, मंडळ कृषी अधिकारी हिंदुराव मोरे (पोयनाड), मंडळ कृषी अधिकारी मोहन सूर्यवंशी (नागाव), तालुका पाणी फाऊंडेशन मेंटॉर तथा कृषी सेवक स्मिता कबाडी, तालुका अभियान व्यवस्थापक माधुरी संकेत जाधव, उमेद मेंटर रिया रुपेश पाटील, रोशनी शैलेंद्र पिंगळे तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना एकत्रितपणे स्पर्धेत सहभागी होऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. ‘एकत्रित प्रयत्न, सक्षम शेतकरी फार्मर कप 2026 यशस्वी करूया!’ असा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
