| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावर पार्ले येथील एका शेतकर्याचा अवकाळी पावसाच्या गडगडाट कडकडाटात हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलादपूर तालुक्यातील पार्ले येथील शेतकरी श्रीधर राजाराम मोरे (68) यांची हृदयविकारामुळे 1916 मध्ये बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यामुळे धकाधकीच्या जीवनापासून दूर गावी ते एकटेच राहावयास आले होते. त्यांनी शेतीसोबत आंबा उत्पादन, कुकुटपालन, बकरीपालन आदी शेतीपूरक व्यवसाय वाढविले होते. आंबा बागायतीसाठी पाणी देण्याकामी त्यांनी सोलार पंपदेखील फार्महाऊसलगत बसविला होता. गेल्या 14 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी सोलार पॅनेलखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. श्रीधर मोरे हे 2-3 दिवसांपूर्वीच फार्महाऊसवर राहण्यास गेले असता त्याकालावधीमध्ये तालुक्यात अवकाळी पावसाचा गडगडाट कडकडाट झाला. यामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची खबर रत्नदीप सुंदरराव मोरे यांनी पोलादपूर पोलीसांना दिली. याप्रकरणी पोलीस नाईक महाडीक हे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.