। नेरळ । प्रतिनिधी ।
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नपूर्णा योजनेतून लघु उद्योग करणार्यांना अर्थ सहाय्य केले जाते. या योजनेतून कर्जत तालुक्यात तीन लघु उद्योग सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतकर्यांनी शेवगा मोळी प्रक्रिया आणि भाकरी चपाती प्रक्रिया युनिट सुरू करण्यात आले असून आता शेतकरी लघु उद्योजक बनला आहे. यावेळी गौरकामत येथील शेतकरी मुकुंद अनंत राणे यांनी पोहा मिल प्रक्रिया युनिटची निर्मिती केली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 29 लाख रुपयांच्या प्रकल्पाला दहा लाखाचे अनुदान या योजनेतून मिळाले आहे. भाताचा पोहा बनविण्याबरोबर कडधान्य यांच्यापासून पोहा निर्मिती करण्याचे युनिट सुरू केले आहे. तसेच, तालुक्यात गौलवाडी येथे शेवगा मोळी प्रक्रिया युनिटची निर्मिती शेतकरी प्रतिभा प्रदीप पावसकर यांनी केली आहे. या दोन्ही प्रकल्पालादेखील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात आले आहे.