रिलायन्सविरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक

5 जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा

| नेरळ | प्रतिनिधी |

रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईनमुळे येथील शेतकरी बाधित झाले आहेत. मात्र त्यांना आर्थिक मोबदला मिळालेला नाही. गेल्या पाच वर्षांपासून शेतकरी लढा देत आहेत. मात्र सरकार आणि प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. याविरोधात आर-पारची लढाई लढण्यासाठी आता शेतकऱ्यांनी व्रजमूठ आवळली असून, त्यांनी 5 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

रिलायन्स कंपनीची इथेन गॅस पाईपलाईन ही नागोठणे ते गुजरात-दहेजपर्यंत गेलेली आहे. त्यापैकी कर्जत तालुक्यातील अनेक शेतातून पाईपलाईन गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती या प्रकल्पामुळे बाधित होऊन त्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील निकोप, अवसरे, बिरदोले, कोदिवले, दहिवली, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, वाकस, नसरापुर, गणेगाव, कडाव, मार्केवाडी, सालवड कर्जत या गावातील रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन प्रकल्पग्रस्त शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी विविध सनदशीर मार्गाने न्याय मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. या शेतकऱ्यांनी या आधीदेखील आंदोलन उभारले होते. मात्र, आश्वासनांखेरीज त्यांच्या पदारात काहीच पडले नाही.

नुकतेच 26 ऑक्टोबर रोजीदेखील शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. तेव्हा बैठकीचे आश्वासन देऊन त्यातून मार्ग काढू, असे सांगत रिलायन्स प्रशासनाने यांनी वेळ मारून नेली होती. 5 जानेवारीपासून कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करणार असल्याचे पत्र शेतकरी केशव तरे यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने कर्जत तहसीलदार यांना दिले आहे. कर्जत तालुक्यातील रिलायन्स गॅस प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केले आहे.

रिलायन्स प्रशासन शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. आता काय आमचा जीव जाण्याची वाट पाहणार आहात का? कंपनी अधिकारी हे मुजोर असून, ते फक्त प्रकरण शांत करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक करून प्रकल्पग्रस्तांवर दबाब टाकण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आता आर-पारची लढाई सुरु झाली आहे. न्याय मिळेपर्यंत माघार नाही. आमच्या जीवाचे काहीही बरे वाईट झाले, तर त्याला रिलायन्स कंपनी आणि जिल्हा प्रशासन हे दोघेही जबाबदार राहतील.

केशव तरे, शेतकरी
Exit mobile version