ऊर्जा प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक

जीव गेला तरी बेहत्तर, पण जमीन देणार नाही

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या विजेच्या टॉवरसाठी मोजणीचे काम ओवे कॅम्प येथील शेतकऱ्यांनी बंद पाडले. बळजबरीने टॉवर उभारल्यास टॉवर्ससाठी खोदकाम करणाऱ्या खड्ड्यात प्राण देऊ; पण जमीन देणार नाही, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे जमिनीच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या मुंबई ऊर्जा टॉवरचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांना माघारी फिरावे लागले.

मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या विजेच्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीचे टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांना नोटीस न देता आणि शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता पोलीस फौजफाटा घेऊन जमिनीचे मोजमाप करीत असल्याची माहिती ग्रामस्थांना प्राप्त होताच गावातील जवळपास दोनशे महिला, पुरुष शेतकऱ्यांनी टॉवर उभारणीला विरोध केला. शासनाने आमचे गाव पुनर्वसन केले. मात्र, कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. आम्ही किती वेळा विस्थापित होणार, नवीन प्रकल्प आमच्यावर लादून आमच्यावर केलेला हा सामाजिक आघात आहे. बळजबरीने टॉवर उभारल्यास टॉवर्ससाठी खोदकाम करणाऱ्या खड्ड्यात प्राण देऊ; पण जमीन देणार नाही, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. मुंबई ऊर्जा प्रकल्पाबाबत शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही काम सुरू होऊ देणार नाही.

राम जाधव, ओवे कॅम्प ग्रामस्थ
Exit mobile version