खरीप हंगामासाठी बळीराजा सज्ज

रायगडात एक लाख हेक्टरवर विविध पिकांची होणार लागवड
एकूण लागवडीच्या 90 टक्के क्षेत्रावर भातलागवड

। अलिबाग । भारत रांजणकर ।

यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण 1 लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार असून, बळीराजा खरीपपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतला आहे. रायगडचे प्रथम क्रमांकाचे खरीप पीक असणार्‍या भाताची (तांदूळ) लागवड या एकूण लागवड क्षेत्राच्या 90 टक्के क्षेत्रावर होणार आहे. द्वितीय क्रमांकाचे महत्त्वाचे पीक असणार्‍या नागलीची लागवड 3 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर, तर तूर अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेळे यांनी दिली आहे.


या खरीप हंगामामध्ये युरीयाब्लिटी ब्रिकेट मागील वर्षाप्रमाणेच शेतकर्‍यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याबद्दलची कार्यवाही चालू आहे. खरीप हंगामाकरिता बियाणे आणि खते यांचा पुरवठा वेळेत आणि पुरेशा प्रमाणात होईल याकरिता महाबीज, आरसीएफ, एनएआयडीसी या सर्वांंना आमच्या स्तरावरून सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये असलेल्या एक लाख हेक्टर खरीप हंगाम क्षेत्रावरती आवश्यक असणारी भात, नागली, तूर यांच्या बियाणांची महाबीज तसेच खासगी कंपन्यांमार्फत होणारी उपलब्धता, त्याचप्रमाणे शेतकर्‍यांनी सर्व प्रकारचे बियाणे वापरले जाते, अशा सर्व प्रकारच्या बियाण्यांवरती बीज प्रक्रियेची मोहीम राबविण्यात येत आहे. गावोगाव कृषी सहाय्यकांमार्फत बैठका घेण्यात येत आहेत. ग्राम कृषी विस्तार समित्यांची स्थापना होऊन त्यांच्या बैठकांमध्ये या खरीप हंगामामधील कार्यक्रम करणार आहोत. याबाबतची माहिती देण्यात येत असल्याचेही कृषी अधीक्षक बाणखेले यांनी स्पष्ट केले आहे.

37 हजार हेक्टरवर बीजप्रक्रिया मोहीम
त्यासाठी शंभर टक्के गावांमध्ये कृषी विकास समित्या स्थापन झालेल्या आहेत. ज्याच्यामध्ये सरपंच व ग्रामसेवक आणि गावातील प्रगतीशील शेतकरी आणि कृषी सहाय्यक सदस्य आहेत. त्यामुळे प्रचार, प्रसिद्धीच्या माध्यमातून तंत्रज्ञान विस्तार खूप मोठा प्लॅनिंग या वेळेस केलेले आहे. साधारणपणे खरीप हंगामात 56 हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत आपण काम करण्याचे प्रयत्न असणार असून, जवळपास 37 हजारहेक्टरवर बीजप्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रगत प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आणि शेतकरी प्रशिक्षण यांच्या माध्यमातून नेण्यासाठी राष्ट्रीय कृषी योजना आहे. अन्नसुरक्षा आणि आत्मा योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांपर्यंत पोहोचू, असा विश्‍वास उज्ज्वला बाणखेळे यांनी व्यक्त केला.

या खरीप हंगामामध्ये चारसूत्री पद्धतीची लागवड, ड्रम फिडर पद्धतीची लागवड, सगुणा राईस तंत्रज्ञान पद्धतीने लागवड, पट्टा पद्धतीने लागवड याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभाग काम करणार आहे.

उज्वला बाणखेळे, अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड
Exit mobile version