| मुंबई | वृत्तसंस्था | राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादात अडकले आहेत. आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले असून, या अधिवेशनात ते सभागृहातच मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा सदर व्हिडीओ एक्सवर शेअर केला होता. एकीकडे राज्यातील शेतकरी दशकाळाच्या खाईत आणि कर्जाच्या डोंगराखाली दडपून त्रस्त असल्याचे चित्र असताना दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री मोबाईलवर रमी गेम खेळण्यात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळाल्याने बळीराजाने आपल्या व्यथा कुणाकडे मांडायच्या असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या घटनेवरुन सर्वच विरोधी पक्षांकडून कोकाटे यांच्यावर टीका होताना दिसत आहे. शेतकरी कामगार पक्षानेदेखील कृषीमंत्र्यांच्या सभागृहातील मोबाइलवर रमी गेम खेळण्याच्या प्रकाराचा निषेध केला आहे.
सत्तेतल्या राष्ट्रवादीला कुठलीही गोष्ट भाजपला विचारल्याशिवाय करता येत नाही. सध्या राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासोबतच राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असून तरीदेखील यांना निर्णय घेता येत नाही. कारण प्रत्येक गोष्ट भाजपला विचारावी लागते. त्यामुळे आता हातात काहीच काम शिल्लक नसल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळत असल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे.
कृषीमंत्री महाराष्ट्रात जुगाराचं पिक पेरण्यात व्यस्त आहेत. त्यांची फळं महाराष्ट्रातील तरुण पिढी आणि बळीराजा भोगत आहे. महाराष्ट्र विधानसभेचा बहुमुल्य वेळ मंत्री महोदय सत्कारणी लावताना पाहून राज्याची खूपच प्रगती झाली आहे असे वाटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरच या मंत्र्यांना आता काम नसल्यामुळं घरी बसवायला हरकत नाही, अशी टीका मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे.
मी विधानपरिषदेत कामकाजासाठी बसलो होतो. तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाले असावे. म्हणून मी खालच्या सभागृहात काय कामकाज सुरू आहे, हे पाहण्यासाठी युट्यूबवर गेलो होतो. युट्यूबवर व्हिडीओ सुरू केल्यानंतर जाहिराती येत असतात. त्याप्रमाणेच त्यावेळी सदर जाहिरात आली. मी जाहिरात स्किप करून पुढे गेलो. पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी फक्त 18 सेकंदाचाच व्हिडीओ दाखवला, असे स्पष्टीकरण राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे. माणिकराव कोकाटे राज्याचे जबाबदार मंत्री आहेत. त्यांनी व्हायरल व्हिडीओवर स्वतः खुलासा केला आहे. त्यांना काही सूचना द्यायच्या असतील तर त्या देईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
राज्यात कर्ज माफीचे आश्वासन देऊनही त्याची पुर्तता करण्यात आली नाही. सरकारच्या या भूमिकेबाबत शेतकरी प्रचंड नाराज आहेत. सभागृहातील या प्रकारामुळे कृषीमंत्री गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. राज्याला अभ्यासू व शेतकऱ्यांबद्दल आस्था असणारा मंत्री असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.
जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहे. एकीकडे शेतीमालाला हमीभाव नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही शेतीशी घट्ट जोडलेली आहे, वारंवार शेतकऱ्यांच्या श्रमाचा अपमान करणारे, शेतकाऱ्यांबद्दल आपुलकी नसलेले कृषिमंत्री कोकाटे यांचा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध !!!