उरण महसूल खात्याच्या बेजबाबदारपणा
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कापणी प्रयोग राबविण्यात आला आहे. या पीक कापणी प्रयोगात तालुक्यातील गावागावातील शेतकऱ्यांच्या पीक कापणीच्या प्लॉटची तालुक्यातून ड्रॉ पद्धतीने आणेवारीसाठी निवड करण्यात आली. दरम्यान, चिरनेर येथील दोन शेतकऱ्यांची पीक कापणी प्रयोगासाठी ड्रॉ पद्धतीने आणेवारीसाठी निवड झाली होती. यानुसार उरण महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटला भेट देखील दिली. मात्र, त्यातील एका शेतातील पीक कापणी अपूर्ण ठेवल्यामुळे भटक्या जनावरांनी उर्वरीत पिकाची नासधुस केली आहे. तसेच, दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरातील भाताचे वजन करून कोप्रोली मंडळ महसूल अधिकाऱ्यांकडून खोटा अहवाल तयार करण्यात आला, अशी माहिती कृषीमित्र तथा महाराष्ट्र शासनाच्या शेतीनिष्ठ पुरस्काराचे मानकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली आहे.
चिरनेर येथील गौरव ठाकूर व धनाजी नारंगीकर या शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्लॉटची ड्रॉ पद्धतीने आणेवारीसाठी निवड करण्यात आली. त्यानुसार उरण महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी नुकतीच या शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटला भेट दिली. त्यात गौरव जगदीश ठाकूर यांच्या पीक कापणीच्या प्लॉटची अपूर्ण कापणी करून बाकीचा प्लॉट तसाच टाकून दिला. त्यानंतर राहिलेला प्लॉट कापण्यासाठी महसूल खात्याचे कर्मचारी न आल्यामुळे रानातील उनाड गुरांनी या प्लॉटच्या भात पिकाची पूर्णपणे नासाडी करून भात पीक खाऊन फस्त केले आहे. तर, धनाजी नारंगीकर या शेतकऱ्याचा पीक कापणीचा प्लॉट न कापताच, शेत घरामध्ये असलेल्या पिशवीतील भाताचे वजन करून, कोप्रोली मंडळ महसूल अधिकाऱ्यांकडून खोटा अहवाल तयार करण्यात आला आहे. अशी माहिती प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली आहे.
महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या गलथान व बेजबाबदार कारभाराबद्दल संताप व्यक्त केला असून, या शेतकऱ्यांच्या प्लॉटचे उनाड गुरांकडून झालेल्या नुकसानीबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, महसूल खात्याचे कर्मचारी खोटा अहवाल तयार करून, शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक करत असतील तर शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारातच राहील, अशा शब्दात येथील शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया
पीक कापणी प्रयोगाबाबत माहिती घेतली असता, सर्वप्रथम गावातील किंवा क्षेत्रातील काही यादृच्छिक रॅडम पद्धतीने निवडले जातात. या निवडीमध्ये विशेष मोबाईल ॲप किंवा दूर संवेदन तंत्रज्ञाचा वापर केला जातो. निवड केलेल्या शेतात ठराविक क्षेत्र उदा. 5 मीटर बाय 5 मीटर मोजून घेतले जाते. हे क्षेत्र गुप्तपणे ठेवले जाते. त्यानंतर ज्यावेळी पर्यवेक्षक प्रत्यक्ष येतो तेव्हाच अंतिम निवड होते. या शेतातल्या नमूद क्षेत्रातील सर्व पीक कापून अंतिम उत्पन्नाची मोजणी किलो, हेक्टर अशी केली जाते. कापणी झालेल्या पिकाची मळणी करून धान्याचे अंतिम वजन घेण्यात येते. ही सर्व माहिती, फोटो, वजन आदी मोबाईल ॲप किंवा पिक विमा पोर्टलवर तात्काळ अपलोड केली जाते.
शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात
प्रत्येक हंगामातील पीक कापण्याच्या योग्य वेळेला व कापणी सुरू होण्याच्या पंधरा ते वीस दिवसांत पीक प्रयोग शेतात प्रत्यक्ष पिकाची कापणी सुरू करण्यात येते. असे नियम असताना, अशा प्रकारे रॅडम प्लॉटचे कोप्रोली मंडळ खरीप पिक आणेवारी घेत असेल तर शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याची प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बदलत्या निसर्गचक्राच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणात अडकत असेल तर शेतकऱ्यांचा भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.
