तहसील कार्यालयाच्या हलगर्जीपणाचा आरोप; मनसेकडून कारवाईची मागणी
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ न मिळाल्यामुळे शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने तहसील कार्यालयाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनसेचे शॅडो कॅबिनेट सदस्य व जिल्हाध्यक्ष देवव्रत विष्णू पाटील यांनी सोमवारी (दि. 30) तहसीलदार विक्रम पाटील यांना लेखी निवेदन देत या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करूनही ‘फार्मर आयडी’ मिळाले नसल्याने त्यांना विविध शासकीय योजना, अनुदान, विमा तसेच नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. विशेषतः 2025 मधील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवताना अतिरिक्त अडचणींचा सामना करावा लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. देवव्रत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना वारंवार तलाठी व तहसील कार्यालयाचे फेरे मारावे लागत असून, तरीही प्रक्रिया पूर्ण होत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
तहसील कार्यालयातील हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून तात्काळ सर्व शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ देण्यात यावेत, अन्यथा मनसे आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला. माहिती अधिकार संघर्ष समितीमार्फतही हे निवेदन देण्यात आले असून, शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रश्नामुळे अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







