शेतकर्‍याची दिवाळी चिखलात

| अलिबाग । वार्ताहर ।
जिल्ह्यात परतीचा पाऊस जाण्याचे नाव घेत नसल्यामुळे शेतकर्‍यांची दिवाळी चिखलातच साजरी होणार अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेले भात पीक घरात आणण्यासाठी शेतकर्‍याला मोठे कष्ट करावे लागत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिलासा मिळाल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी कापणीच्या कामात हात घातला होता; मात्र मंगळवारी पहाटे अचानक पावसाला सुरुवात झाली. अनेक शेतकर्‍यांचे पीक शेतात भिजले. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे भात वाळवण्यासाठी शेतकर्‍याला संधी मिळाली नाही. त्यामुळे हाताशी आलेले पीक खराब होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पावसाने दोन-चार दिवसांत उसंत घेतली नाही तर सुमारे 40 टक्के उत्पन्न कमी होणार असल्याची भिती व्यक्त होत आहे. यंदा जिल्ह्यात एक लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात भात हेच प्रमुख पीक घेण्यात येते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचा हाच प्रमुख मार्ग आहे. मात्र, वार्‍यासह धुव्वांधार पाऊस झाला. या अचानक आलेल्या संकटात बहुतांश ठिकाणी तयार झालेले पीक आडवे पडले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात सुमारे एक लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड करण्यात आली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भात कापणीला सुरुवातदेखील झाली होती. परंतु परतीच्या धुव्वांधार सरी कोसळल्याने नुकसान झाले आहे. जिल्ह्यात शनिवारी पडलेल्या पावसामुळे अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची धावाधाव झाली. अनेकांनी कापणी केलेले भात पाण्यात भिजून खराब होऊ नये यासाठी रोपे उचलून बांधावर ठेवली. रात्री आठ ते साडे आठ वाजेपर्यंत पाऊस होता. त्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. 12 आणि 13 ऑक्टोबरला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भिती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला पाऊस पडला. त्यानंतर शनिवारी पुन्हा बरसला. पाऊस असाच सुरु राहिल्यास सुमारे 40 टक्के भात पिकांचे नुकसान होऊन सुमारे 50 टक्के उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version