| माणगाव | प्रतिनिधी |
पुणे जिल्ह्यातील मोशी येथे सुरू असलेले भारतातील सर्वात मोठे किसान प्रदर्शन हे केवळ एक प्रदर्शन न राहता शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. दिनांक 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत भरविण्यात आलेल्या या भव्य कृषी प्रदर्शनात पारंपारिक शेतीकडून आधुनिक, शाश्वत आणि उत्पन्नवाढीच्या शेतीकडे वाटचाल करण्याचा अचूक मार्ग शेतकऱ्यांना दाखविण्यात येत आहे.
या प्रदर्शनाला माणगाव येथील स्वराज्य संघटनेचे संस्थापक व शेतकरी नेते पंकज तांबे यांनी प्रत्यक्ष भेट देत आधुनिक शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे व प्रयोगांची सखोल माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयोगी ठरणाऱ्या नवकल्पना, यंत्रसामग्री आणि संशोधनाधारित शेती पद्धती यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. या किसान प्रदर्शनात शेतकऱ्यांना लागणारी आधुनिक शेती अवजारे, यांत्रिकीकरणासाठी आवश्यक उपकरणे, ड्रिप व स्प्रिंकलर सिंचन प्रणाली, पाणी व्यवस्थापनासाठी विविध प्रकारचे पंप व साधने, तसेच माती परीक्षणाच्या आधुनिक पद्धती यांची सविस्तर माहिती देण्यात येत आहे. उत्पादन खर्च कमी करून नफा वाढवण्यासाठी कोणती साधने आणि तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकतात, याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन येथे मिळत आहे. शेतीपूरक उद्योगांमध्ये रस असणाऱ्या तरुण-तरुणींना छोट्या उद्योगापासून मोठ्या उद्योगांपर्यंत लागणाऱ्या आधुनिक मशिनरी, नव्या तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आलेली यंत्रसामग्री प्रत्यक्ष पाहण्याची व समजून घेण्याची संधी या प्रदर्शनातून मिळत आहे. कृषी उद्योजकतेकडे वळू इच्छिणाऱ्या युवकांसाठी हे प्रदर्शन प्रेरणादायी ठरत आहे. या प्रदर्शनात कृषिविषयक बी-बियाणे, रोपे, ऊस वाटिका, तसेच विविध पिकांसाठी उपयुक्त असणाऱ्या सुधारित जाती शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नवे प्रयोग करावेत, पीक पद्धतीत बदल घडवावा आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी, यावर या प्रदर्शनात विशेष भर देण्यात आला आहे. याशिवाय गांडूळ खत निर्मिती, शेततळ्यासाठी आवश्यक ताडपत्री, आधुनिक प्लास्टिक कल्चर, संरक्षित शेती यांचा शेतीमध्ये कसा प्रभावी उपयोग करता येतो, याची सखोल माहिती तज्ज्ञांच्या माध्यमातून दिली जात आहे.







