मोबदल्याकडे शेतकर्‍यांचे डोळे; निधीअभावी भूसंपादन रखडले

450 हेक्टर क्षेत्रासाठी 200 कोटी अपेक्षित
| माणगाव | वार्ताहर |
कॉरिडॉरसाठी माणगाव, रोहा तालुक्यातील एमआयडीसी भूसंपादन करीत आहे. माणगाव तालुक्यातील प्रस्तावित क्षेत्रापैकी 450 हेक्टर जमिनीचे भूसंपादनाचे काम सुरु आहे. जुलै ते नोव्हेंबरपर्यंत तब्बल पाच महिने लोटले तरी बाधित शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला मिळालाच नाही. या मोबदल्यासाठी काही शेतकरी शासन दरबारी खेटे मारत आहेत. 450 हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे 200 कोटी रुपये अपेक्षित आहेत. तशी मागणीही माणगाव उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी शासनाकडे केली आहे. मात्र, या मोबदल्याचे शासनाकडून अनुदान आले नसल्यामुळे ऐन दिवाळीत बाधित शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रूच उभारले. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमुळे माणगाव जरी जगाच्या नकाशावर पोहोचला असला, तरी तिसर्‍या नव्या मुंबईमुळे माणगाव तालुक्याला अधिक वैभव प्राप्त झाले आहे. त्यामुळे माणगावच्या औद्योगिकीकरणात भर पडली ती लोहमार्ग, सागरीमार्ग आणि महामार्गाची. त्यामुळे माणगाव तालुक्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर माणगांव वसलेले असून या तालुक्याची लोकसंख्या सुमारे 1 लाख 55 हजाराहून अधिक आहे. तालुक्यात 187 गावे व 74 ग्रामपंचायतींचा समावेश होता. 1983 मध्ये विळे भागाड औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यानंतर मोठमोठया देशी-विदेशी कंपन्यांनी या ठिकठिकाणी प्रकल्पासाठी काम सुरू केले आहे. याव्यतिरिक्त कॉरीडॉर अंतर्गत माणगांव, रोहा तालुक्यात औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया झपाट्याने सुरु आहे.

खोत मस्त, कुळ उद्ध्वस्त
तालुक्यातील बहुसंख्य जमिनी कुळवहिवाटीच्या आहेत. कुळांना कायद्याचे अज्ञान असल्यामुळे सदर जमिनीच्या महसूल दप्तरी सात बारा उतार्‍यावर अद्यापही खोतांची नावे आहेत. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉरकरिता या जागा संपादन करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर व या जमिनीला सोन्यापेक्षा अधिक पटीने दर आल्याने खोतांचे वारस खडबडून जागे झाले असून, मोबदल्यासाठी शासनदरबारी खेटे मारत आहेत. त्यामुळे पिढ्यान् पिढ्या खोताची जमीन करणारा कुळ मात्र उद्ध्वस्त होत आहे. खोताना भूसंपादनाचा मोबदला देण्यास कुळांनी आक्षेप घेतला आहे.

Exit mobile version