शेतकर्‍यांमुळे सरकारला कृषी कायदे रद्द करण्यास भाग पडल; माजी आ. पंडित पाटील

माणगाव । प्रतिनिधी ।
शेतकर्‍यांच्या रेट्यापुढे केंद्र सरकारला त्यांनी अंमलात आणलेले कृषी कायदे रद्द करण्यास भाग पाडले असे प्रतिपादन अलिबाग विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी माणगाव येथील आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केले.
लखिमपुर खेरीच्या शहीद शेतकर्‍यांच्या अस्थीकलशांना मानवंदना देण्यासाठी दि.28 नोव्हेंबर रोजी शेतकरी कामगार महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे .या महापंचायतीला राज्यभरातून शेतकरी कामगार पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी माणगाव तालुका शेकापचे चिटणीस रमेश मोरे यांच्या निवासस्थानी पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांची आढावा बैठक शुक्रवार दि.26 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील शेतकर्‍यांनी आझाद मैदानावर 28 नोव्हेंबर रोजी जमायचे असून त्याचे यजमानपद शेकापला दिले आहे. हा एक ऐतिहासिक क्षण असून क्रांती दिनासारखा प्रसंग आहे. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी निवडणुक काळात लोकांना दिलेली आश्‍वासने पूर्ण केली नाहीत. महागाई, वीजबिले यागोष्टींमुळे मोदी सरकारला सारे कंटाळले आहेत. यासाठी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी व शेकाप कार्यकर्त्यांनी सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले.
त्यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे, कृउबा समिती सभापती माणगाव संजय पंदेरे, म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील, पोलादपूर तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड, वैभव चांदे, दामू बटावले, हसनामिया बंदरकर, विलास गोठल, याकुब चीलवान, मोअज्जम, सुरेश अर्बन, बळीराम खडतर, विजय आंब्रे, गोविंद पवार, विलास मोरे, सचिन मोरे, निवृती मोरे, विजय आंब्रे, नथुराम आडीत, संतोष सुतार आदींसह शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version