शेतकर्‍यांच्या धान्याला योग्य भाव मिळणार

आधारभूत भात खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार, प्रशासनाचे लेखी आश्‍वासन
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सध्या शेतकर्‍याला वादळी संकट व अतिवृष्टीने बेजार केले आहे. निसर्गाचा लहरीपणा व नैसर्गिक आपत्तीने शेतकरी देशोधडीला लागलाय, अशातच शासनाचे काही अन्यायकारक धोरणे शेतकर्‍याच्या मुळावर उठलीत, सुधागड तालुक्यात लवकरात लवकर आधारभूत भातकेंद्र सुरू होऊन शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून होणारी लयलूट थांबावी अशी मागणी केली होती. या मागणीला यश आले असून लवकरच सुधागडातील भात खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील या आशयाचे पत्र पाली सुधागड नायब तहसीलदार वैशाली काकडे यांनी बुधवारी (दि.27) रोजी दिले.
नैसर्गिक आपत्तीने येथील शेतकरी कोलमडला आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने भातपीक उद्ध्वस्त झाले. यातून ही उरले सुरलेला भात विक्री करावी तर आधारभूत भातकेंद्र सुरू नसतात. दिवाळीचा गोड सण जवळ आला आहे, भातकापणी देखील जोरात सुरू आहे, मात्र भात खरेदी केंद्र दिवाळी नंतर सुरू होतात अशी परिस्थिती दिसून येते. दिवाळी सणाला शेतकर्‍यांच्या हाती पैसे नसतात. परिणामी नाईलाजाने शेतकर्‍यांना आपला भात खाजगी व्यापार्‍यांना कमी किंमतीत विकावा लागतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. म्हणून लवकर भात खरेदी केंद्र सुरू करण्यात यावेत अशी केली होती. प्रशासनाने भात खरेदी केंद्र सुरू होणार असल्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version