| तळा | प्रतिनिधी |
आंबा पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित न झाल्यामुळे तळा तालुका शेतकरी संघटनेतर्फे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्याजवळ तळा तालुका शेतकरी संघटना यांच्या वतीने पीक विम्याबाबत पत्र व्यवहार केला असता त्यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या मंत्रालयाच्या दालनात बैठक घेतली होती. या बैठकीला कृषी आयुक्त, जाइंट डायरेक्टर, रायगड जिल्हा कृषी अधीक्षक तसेच विमा कंपनीचे प्रतीनिधी हजर होते.
या बैठकीच्या दरम्यान कृषी आयुक्त, जाइंट डायरेक्टर तसेच विमा कंपनीचे प्रतीनिधी यांनी संगितले की, नोहेंबरच्या 5 तारखेपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होईल. मात्र, 18 नोव्हेंबर उजाडला तरी कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे वितरित झाले नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून विमा कंपनीने आपला शब्द न पाळल्यामुळे विमा कंपनीच्या विरोधात तळा तालुका शेतकरी संघटना बुधवारपासून (दि.19) तळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.







