न्याय्य हक्कासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

इमॅजिका कंपनीविराधोत खानाव ग्रामस्थ एकवटले

| रसायनी | वार्ताहर |

खालापूर तालुक्यात असलेल्या खानाव ग्रामस्थांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी गोदरेज इमॅजिका कंपनीच्या गेटसमोर शुक्रवार, दि.23 रोजी दुपारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. स्थानिक प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खानाव हद्दीत गोदरेज इमॅजिका या कंपनीने सर्वे.नं.199,147,198,197,196 व अन्य जमीन खरेदी केली आहे. अंदाजे 120 एकर जमीन शेतकरी यांच्याकडून कवडीमोल भावाने खरेदी केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यातील 85 एकर जमीन बिनशेती करुन त्यावर नियोजित प्लॉटिंग करून इमारत, बंगलो, रो हाऊस करण्यात येणार आहेत. यातील काही जागेवर काम सुरू केले आहे. मात्र, स्थानिकांना रोजगार दिला नाही, असा आरोप शेतकरी ग्रामस्थ यांचा आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी कवडीमोल किमतीत जागा विकली, कारण त्याबदल्यात त्यांना रोजगार उपलब्ध होणार होता. परंतु, त्यांची कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेती हा एकमेव उद्योग होता, तिही विकली गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.14 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनी व्यवस्थापन यांना पत्र देण्यात आले होते, सात दिवसात त्यांनी काहीही हालचाल न केल्याने पुन्हा दोन दिवसांचे स्मरण पत्र दिले, त्यावर ही काहीही निष्पन्न न झाल्याने अखेरीस आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तानाजी लक्षुमन मोगारे, सुनील रामा सोनावणे व सीमा सुनिल सोनावणे आमरण उपोषणाला बसले आहेत. मोनिकेत पाटील, रविंद्र पाटील, जितेंद्र धामणसे, रामदास मराडे, यशवंत चव्हाण यांच्यासह खानाव ग्रामपंचायत सदस्य संगमी मोगारे यांच्यासह अनेक महिला उपोषणाला बसले आहेत. दरम्यान स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी यातून मार्ग काढावा, अशी चर्चा उपोषण स्थळी होती. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार खालापूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version