रेल्वे उड्डाण पुलाची मोजणी रोखली; स्थानिक पातळीवर मोठा विरोध
| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे मार्गावर असलेल्या कर्जत तालुक्यातील चिंचवली येथे रेल्वेकडून उड्डाण पूल बांधला जाणार आहे. परंतु, या उड्डाण पुलाला स्थानिक पातळीवर मोठा विरोध होत असून स्थानिकांनी शासनाला निवेदने देऊन विरोध केला आहे. तरीदेखील रेल्वे अधिकारी उड्डाण पूल बांधण्यासाठी जमिनीची मोजणी करण्यासाठी त्याठिकाणी पोहचले. यादरम्यान, स्थानिकांनी त्यांना मोजणी करून देण्यास विरोध करीत मोजणी बंद पाडली.
कर्जत तालुक्यातील चिंचवली येथील फाटक क्रमांक 23 बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या भागात उड्डाण पूल बांधण्यास मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून परवानगी दिली आहे. त्यामुळे रेल्वेकडून त्या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. रेल्वे प्रशासनाने जुलै 2023 रोजी नकाशात नमूद केल्या प्रमाणे हिरव्या रंगातील अलाइनमेंट निश्चित केली होती. या अलाइनमेंटमध्ये कोणत्याही स्थानिकांचे घर बाधित होत नव्हते, तसेच सध्याच्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याला जोडली जात होती. मात्र, त्यानंतर डिसेंबर 2025 रोजी रेल्वेने लाल रंगातील नवीन अलाइनमेंट निश्चित केली. या बदलामुळे अनेक रहिवाशांची घरे जमीनदोस्त होणार आहेत. विशेष म्हणजे, आजूबाजूला पर्यायी मोकळी जमीन उपलब्ध असतानाही हा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे हा प्रकार जाणीवपूर्वक होत असल्याची भावना स्थानिकांमधून निर्माण होत आहे. याबाबत स्थानिक शेतकरी आणि रहिवाशी यांनी डेप्युटी कलेक्टर आणि रेल्वे प्रशासनाला लेखी आक्षेप नोंदवला होता. त्यानुसार, दि.3 एप्रिल रोजी डेप्युटी कलेक्टर श्रीकांत गायकवाड आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. त्यावेळी आमची हरकत नोंदवून तलाठी यांना पंचनामा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की, कोणतेही घर बाधित होऊ नये. परेंतु, आता पुन्हा शनिवारी (दि.18) सर्व्हे होणार असल्याची नोटीस देण्यात आली आहे.
पूर्वी निश्चित केलेल्या अलाइनमेंटमध्ये कमी शेतीजमीन बाधित होत होती, कोणतेही घर बाधित होत नव्हते आणि प्रकल्पाचा खर्चही कमी होणार होता. तरीसुद्धा त्या अलाइनमेंटचा विचार न करता नवीन अलाइनमेंट का राबवली जात आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तरीदेखील पोलीस बंदोबस्तात जबरदस्तीने सर्व्हे करण्याचा प्रयत्न होत असल्याने शेतकरी नाराज आणि संतप्त आहेत. रेल्वेकडून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने शेवटी स्थानिक पातळीवर बाधीत होण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी नियोजित उड्डाण पुलाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. उड्डाण पुलाच्या नवीन रेखांकनामुळे शेतकरी आणि रहिवाशी यांनी मोजणी हाणून पाडली आहे. मोजणीसाठी आलेले रेल्वे अधिकारी कर्मचारी यांना स्थानिक शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे तेथून गाशा गुंडाळला लागला.
आम्हाला पूर्वी दिलेल्या नोटीसीनुसार आमची कोणाचाही घरे तुटली जाणार नव्हती. परंतु, आता नवीन प्लॅन बनविल्याने अनेकांची घरे जमिनदोस्त होणार आहेत. हे लक्षात घेऊन शासनाकडे आम्ही दाद मागितली आहे.शासनाचा मुख्य उद्देश हा कमीतकमी पुनर्वसन करून प्रकल्प बांधण्याचे धोरण असते. परंतु, येथे एवढी घरे तोडून प्रकल्प पूर्ण करून आम्हाला देशोधडीला लावणार का?
योगेश विरले,
स्थानिक रहिवाशी
