31 हजार कोटींची कर्जमाफी
तेलंगणातील काँग्रेस सरकारचा निर्णय
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
तेलंगणामधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने 15 ऑगस्टच्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या 31 हजार कोटींच्या कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना 15 ऑगस्टपर्यंत कर्जमुक्त करू, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. आता तेलंगणामधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने 15 ऑगस्टपूर्वीच कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी तेलंगणामधील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करीत तेलंगणामधील शेतकरी बांधवांच्या कुटुंबांचे अभिनंदन. काँग्रेस सरकारने आपले 2 लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ केले आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. याचा लाभ राज्यातील 40 लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांना होणार आहे. हे शेतकरी कुटुंब कर्जमुक्त होतील. जे बोललो ते करून दाखवले, असे राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले.
तेलंगणा सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचा राज्यातील जवळपास 47 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. कर्जमाफीची आराखड्याबाबत मुख्यमंत्र्याकडून लवकरच आदेश जारी करण्यात येईल. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकरी कर्जमाफी दिली जाईल, असे काँग्रेसने म्हटले होते. शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनामुळेच तेलंगणामध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाल्याचे सांगण्यात येत आहे. तेलंगणा सरकारच्या निर्णयानुसार 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 दरम्यानच्या कालावधीतील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. या कर्जमाफीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी राज्य सरकार एक वेगळे महामंडळ स्थापन करण्याचा विचार करत आहे.