उरण तालुक्यात बळीराजा संकटात

भात खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याची मागणी

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. यंदाही तालुक्यातील दोन हजार 435.85 हेक्टरवर भाताचे पीक घेण्यात आले आहे. गतीवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असून थोड्या प्रमाणात मळणीचे काम बाकी असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. मात्र, भाताच्या पिकात वाढ होऊनही तालुक्यात भात खरेदी-विक्री केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे पिकविलेल्या धान्याला योग्य भाव मिळत नसून दलालांना स्वस्तदरात धान्य विकावे लागत असल्याने बळीराजा संकटात आला आहे.

तालुक्यात मोठीजूई येथे एकमेव भात खरेदी-विक्री केंद्र होते. गेल्या वर्षी या केंद्रावर भात खरेदी केला जात होती. मात्र, यंदा काही प्रमाण सोडले तर मळणीची कामे बहुतांश पूर्ण झाली आहेत. तरी देखील हे भात विक्री केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविलेले धान्य साठवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या रायगड विभागाकडून भात खरेदी केली जाते. यावर्षी रायगड जिल्ह्यात 30 भात खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत. भाताला क्विंटल मागे 2 हजार 183 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा दर 143 रुपये जास्तीचा आहे. मात्र, उरण तालुक्यात अजूनही भात खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना भात विकण्यात अडचणी येत आहेत.

उरण तालुक्यासाठी पनवेल सहकारी भात गिरणीच्या माध्यमातून गेल्या वर्षी भात खरेदी केले आहे. साधारण 4,500 क्विंटल भात खरेदी झाले होते. याही वर्षी लवकरच केंद्र सुरू करणार आहोत.

केशव ताटे, जिल्हा पणन अधिकारी
Exit mobile version