| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील जमिनीला सोन्याचे भाव प्राप्त झाले आहेत. शेती करण्यापेक्षा या जागेवर एखाद्या व्यवसाय अथवा प्रकल्प उभारण्याचा मानस शेतकऱ्यांचा अधिक दिसत आहे. त्यामुळे उरण तालुक्यात भातशेती लागवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे.
तालुक्यातील चिरनेरच्या पूर्व भागात भाजीपाल्यासह कडधान्य पिके आधिक घेतली जातात. सध्याच्या घडीला घेतलेल्या भाजीपाल्याचे उत्पादन कडधान्यापेक्षा जास्त घेतले जात आहे. आदिवासी ठाकूर जमात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. कमी वेळ व कमी कष्टात जास्त नफा देणारी भाजीपाल्याची पिके असल्याने, भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. शेतकरी भाजीपाल्यासह वाल व चवळीची लागवड मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे. उरण तालुक्यात पडवळ, कारली, दुधी, घोसाळी, मिरची, वांगी, टोमॅटो, तोंडली अशा भाजीपाल्यांची लागवड शेतकरी करत आहेत. भाजीपाल्याचे पीक हे मोठ्या कालावधीचे पीक आहे. उत्पन्न देखील अधिक असून, तालुक्यातील शेतकऱ्यांना पनवेल येथे बाजारपेठ उपलब्ध असल्याने भाजीपाल्याचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. कडधान्य हे ओलितांवर घेतले जाणारे पीक आहे. भाजीपाल्याच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने, व जंगली वानरांचा व उनाड मोकाट गुरांचा मोठा त्रास असल्याने कडधान्य उत्पादनाकडे शेतकऱ्यांची पाठ फिरविली आहे.
कडधान्याचे क्षेत्र सुद्धा वाढवायचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वाल, चवळी, मूग, मसूर आदी कडधान्याची पेरणी केली आहे. तर चिरनेर येथील श्री महागणपती सेंद्रिय शेती गटाला पेरणीसाठी फुले विक्रांत व्हरायटीचे हरभऱ्याचे 410 किलो बियाणे दिले आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचा कडधान्य पीक घेण्याकडे कल असावा. त्याचबरोबर तालुक्यातील कडधान्याचे क्षेत्र वाढावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
-सुषमा सुभाष अंबुलगेकर,
कृषी सहाय्यक अधिकारी उरण
ज्यादा उत्पन्न व पनवेल येथे बाजारपेठ उपलब्ध असल्याने कडधान्यांच्या तुलनेत भाजीपाला पिकविण्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल आहे.
-कृष्णा अनंत म्हात्रे.
शेतकरी, चिरनेर







