विमा योजनेसाठी शासनाकडून सुमारे 64 कोटी रुपयांची तरतूद
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
बदलत्या हवामान अवकाळी पाऊस अशा अनेक समस्यांमुळे आंबा उत्पादक शेतकरी कायमच संकटात सापडला आहे. त्यामुळे या शेतकर्यांनी फळपीक विमा उतरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावर्षी सात हजार 734 शेतकर्यांनी विमा उतरविला आहे.गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी एक हजारहून अधिक शेतकर्यांनी विमा काढल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये एक लाख हेक्टरहून अधिक भात पिकाचे क्षेत्र आहे. भात पिकाबरोबरच गेल्या काही वर्षापासून फळपीक लागवडीवरही शेतकरी लक्ष देऊ लागले आहेत. शेत जमीनीबरोबरच मोकळ्या जागेमध्ये आंब्याची लागवड शेतकरी करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यामध्ये फळपिकाचे क्षेत्र 22 हजार 244 हेक्टर इतके आहे. त्यामध्ये आंबा लागवडीचे क्षेत्र 15547 हेक्टर इतके आहे. त्यामध्ये उत्पादन उत्पादनक्षम क्षेत्र सुमारे 13 हजार हेक्टर आहे. फळपिक लागवडीच्या 70 टक्के क्षेत्र आंब्याचे असल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्ह्यामध्ये वीस हजारहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. आंब्याचे क्षेत्र वाढावे शेतकर्यांना त्यातून उत्पन्न मिळावे यासाठी कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे तरुणाई देखील आंबा लागवडीवर भर देत आहे. मात्र जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडणे वातावरणात बदल होणे या प्रकारामुळे अंबा उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची भीती कायमच राहिली आहे. त्यामुळे पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. जिल्ह्यातून सुरुवातीला या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही परंतु गेल्या दोन वर्षात यामध्ये आमुलाग्र बदल झाल्याचे चित्र आहे.
मागच्या वर्षी 6 हजार 329 शेतकर्यांनी फळ पिक विमा उतरवला होता. त्यासाठी शेतकर्यांना 29 हजार रुपये मोजावे लागले होते. या शेतकर्यांना 19 कोटी 50 लाख रुपयाची रक्कम विम्याच्या स्वरूपात प्राप्त झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
यावर्षीदेखील पिकविमा उतरवण्यासाठी कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शेतकर्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नोव्हेंबर अखेरपर्यंत सात हजार 634 शेतकर्यांनी यावर्षी पिक विमा काढला आहे. यंदा मात्र पिक विम्यासाठी 14 हजार रुपये शेतकर्यांना मोजावे लागले. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी 15 हजार रुपये कमी खर्च झाले. विमा योजनेसाठी शासनाकडून सुमारे 64 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले आहे.
अशी करावी लागते मेहनत
झाडाच्या बाजूला असलेले गवत काढणे, सुकलेल्या फांद्या काढणे, झाडाच्या बाजूला खड्डा करून त्यावर पालापाचोळा टाकून सेंद्रीय खत तयार करणे, फवारणी करणे, आंबे काढणे, पेटीत ठेवणे, त्याची वाहतूक करणे अशू अनेक कामे शेतकर्यांना करावी लागतात.