। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
23 गावांमध्ये येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकर्यांची एकजूट कायम होत चालली आहे. या नैनाला शेतकर्यांमधून कायम विरोध केला जात आहे. नैनाला विरोध करण्यासाठी या पुढे शेतकरी मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात शेतकर्यांची पनवेल येथील शेकाप कार्यालयात आमदार जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.
‘नैना हटाव, शेतकरी बचाव’ अशी मोहीम सर्वत्र राबवली जात आहे. पनवेल परिसरात नैनाविरोधी शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने जनजागृती केली जात आहे. सिडकोरुपी नैना ही तालुक्यातील बांधकामे तोडण्यासाठी येते, त्याला नैनाविरोधी शेतकरी उत्कर्ष समिती प्रखर विरोध करुन त्यांना माघारी पाठवत आहे. 28 सप्टेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल येथील कार्यालयात आ. जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली व पुढील मोहीम ठरवण्यात आली.
यावेळी आ. जयंत पाटील यांनी नैनाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकर्यांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी सांगितले की, सर्व शेतकर्यांनी व सर्व गावांनी एकत्र येणे गरजेचे असून, नैनाला विरोध करायचा आहे. आमच्या जमिनी आम्ही विकसित करू, असा पवित्रा शेतकर्यांनी घेतलेला आहे.