शेतकर्‍यांचा विकासासाठी सामंजस्य करार

| अलिबाग । वार्ताहर ।

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व स्वदेस फाउंडेशन यांच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील शेतकर्‍यांचा विकास करण्यासाठी कृषी विकास कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. सामंजस्य करारावर स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रूवाला व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी सह्या केल्या आहेत. यामुळे दक्षिण रायगडमधील सात तालुक्यांना याचा फायदा होणार आहे.

सामंजस्य करारांतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये स्वदेस फाउंडेशन काम करत आहे. पुढील तीन वर्षांमध्ये पोलादपूर, महाड, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन व सुधागड तालुक्यांमधील शेतकर्‍यांसाठी कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत मँगो नेट नोंदणी, मँगो जीआय नोंदणी, शेतकरी कंपनीची स्थापना, शेतकरी गट निर्मिती, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना प्रकल्प अंमलबजावणी, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शेतकर्‍यांना लाभ, बांबू व्हिलेज निर्मिती, किसान क्रेडिट कार्ड नोंदणी व लाभ, सौर ऊर्जा कुंपण लाभ, प्रधानमंत्री पीकविमा योजना व शेतकर्‍यांना विविध प्रशिक्षण या विषयांवर स्वदेस फाउंडेशन व कृषी विभाग एकत्रितपणे समन्वयाने काम करणार आहेत. सामंजस्य कराराचा फायदा स्वदेस फाउंडेशनअंतर्गत असणार्‍या स्वप्नातील गावांमधील शेतकर्‍यांना होणार आहे. कृषी विभागाच्या योजना जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वदेस फाउंडेशन व कृषी विभाग प्रयत्न करेल, असे मत फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी सामंजस्य करार कार्यक्रमादरम्यान केले.

या वेळी संचालक प्रदीप साठे, उपसंचालक तुषार इनामदार, नीता हरमलकर, महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, अफशान शेख, उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय काळभोर, आत्मा तथा नोडल अधिकारी सतीश बोर्‍हाडे आणि पुरवठा व मूल्य साखळी तज्ज्ञ भाऊसाहेब गावडे उपस्थित होते.

Exit mobile version