भिवपुरी जवळील शेतकरी बेहाल

| नेरळ | वार्ताहर |

मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील कर्जत एण्डकडील नेरळ ते भिवपुरी या स्थानकाच्या दरम्यान रेल्वेकडून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नवीन मार्ग निर्माण केले आहेत. मात्र पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्ग आता स्थानिक शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. पाणी वाहून नेणाऱ्या नवीन मार्गामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पाणीच पाणी अशी स्थिती निर्मण झाली आहे. दरम्यान, शेती मधील साठून रहाणारे पाणी कसे बाहेर काढायचे या विवंचनेत शेतकरी आहेत.

मागील दोन वर्षांपूर्वी मुंबई-पुणे या मध्य रेल्वेच्या बदलापूर ते वांगणी या दरम्यान मार्गावर पावसाळ्यातील महापुराची पाणी साचल्याने लांब पल्ल्‌‍याची गाडी थांबली होती. त्यानंतर मध्य रेल्वेकडून रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग बनविले जात आहेत. मागील सहा महिन्यात तालुक्यातुन जाणाऱ्या मध्य रेल्वेचे मार्गावर नेरळ ते भिवपुरी या भागात तीन ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नव्याने मार्ग बनविण्यात आले आहे. लहान आकाराचे साकव बनविण्यात आले असून ते साकव सध्यातरी स्थानिक शेतकऱ्यासाठी कसोटी पाहत आहेत. त्या साकव मधून वाहून येणारे पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतात साचून राहिले असून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पीक घेता येणार नाही अशी आज त्या भागातील शेताची परिस्थिती आहे.

या नुकसानीची भरपाई मध्य रेल्वे त्या शेतकऱ्यांना देणार आहे काय? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. मात्र आपल्या शेतात साचून राहिलेले पाणी बाहेर काढायचे कसे आणि शेती करायची कशी, या विवंचनेत हे शेतकरी असून जमीन नापीक सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर निर्माण झाली आहे.

Exit mobile version