| नागोठणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कानसई-नागोठणे ते डोलवी येथील जेएसडब्लू (जिंदाल स्टील वर्क) कंपनीत 400/220 के.व्ही. ही उच्च वीज दाब वाहिनी टाकण्याच्या कामात बाधित शेतकऱ्यांना अंधारात ठेवून जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासन व संबधित ठेकेदार कंपनी बी.एन.सी पॉवर प्रोजेक्ट लि. च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे या उच्च वीज दाब वाहिनी विरोधात पाटणसई येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी विद्युत मनोरे उभारण्याचे काम बंद पाडले आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी पाटणसई येथे माजी सरपंच सदानंद गायकर यांच्या प्रांगणात शुक्रवारी (दि.30) उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या विरोधात बैठक घेऊन बीएमसी पॉवर प्रोजेक्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाच लाट उसळली आहे.
पाटणसई गावाच्या हद्दीत चार विद्युत मनोरे उभारण्याचे काम कंपनीने शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न बजावता, कोणतीही परवानगी न घेता पाटणसई ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी न घेता शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सुरू केले. पाटणसई गावाच्या हद्दीतील ज्या शेतकऱ्यांच्या जागेतून ही उच्च दाबाची वीज वाहिनी जाणार आहे त्या जागेसह वीज वाहिनीच्या दोन्ही बाजूला सुमारे 23 मीटर अंतरापर्यंत संबंधित शेतकऱ्यांना भातशेती करता येणार नाही. जमिनीवरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीमुळे अशी जमीन भविष्यात कुणीही विकत घेणार नाही अथवा शेतकरी या जागेचा विकासही करु शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल होणार आहेत. त्यामुळेच जेएसडब्ल्यू व ठेकेदार कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात व उच्च दाब वीज वाहिनीमुळे बाधित होणारे पाटणसईमधील सुमारे 25 ते 30 संबंधीत शेतकरी आक्रमक झाले आहेत.
याप्रसंगी सदानंद गायकर, सुरेश गायकर, हेमंत गायकर, गजानन गायकर, रामदास कोलवाल, संजय गायकर, विशाल गायकर, अनिल कोतवाल, शंकर कोतवाल, प्रतीक गायकर, सुनिल कोतवाल, रविंद्र कोतवाल, गजानन दाभाडे, संतोष राणे, गणेश कोतवाल, निलेश कोतवाल, छबिलदास कोतवाल, दत्ताराम कोतवाल, परशुराम कोतवाल, प्रल्हाद दाभाडे, दिपक गायकर आदी उपस्थित होते.
जेएसडब्ल्यूच्या वीज वाहिनीला शेतकऱ्यांचा विरोध
