नैना मोजणीला शेतकर्‍यांचा विरोध

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
21 जून रोजी सिडकोचे भूमापक आणि भूमी अभिलेख विभागाच्या महिला भूमापक विहिघर येथे मोजणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना शेतकर्र्‍यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. या मोजणीला शेतकर्‍यांनी विरोध केला. त्यामुळे या भूमापक अधिकार्‍यांना खाली हात परतावे लागले.यावेळी वामन शेळके, नामदेव फडके, नरेंद्र भोपी, सुनील पाटील, राज पाटील, बाळाराम फडके, विलास फडके, धनंजय पाटील, गजानन पाटील, सुरेश फडके, बबन फडके, यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पनवेल तालुक्यातील 23 गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला आहे. गेल्या दहा वर्षात नैनाने शेतकर्‍यांची दिशाभूल करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम केले असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा प्रचंड विरोध या नैना प्रकल्पाला होत आहे. 21 जून रोजी सिडकोचे अधिकारी आणि भूमिअभिलेख विभागातील महिला भूमापक या विहिघर येथे मोजणीसाठी आल्या होत्या. मात्र हनुमान मंदिर येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थ आणि शेतकर्यांनी त्यांना तीव्र विरोध केला. यावेळी आलेल्या सिडकोच्या भूमापक अधिकार्‍यांकडे त्यांचे आयडेंटी कार्ड सुद्धा नव्हते. यावरून बराच गदारोळ झाला.

शेतकर्‍यांनी भूमापक यांना फैलावर घेतले. शेतकर्‍यांची कोणतीही परवानगी नसताना मोजणीसाठी आलेच कसे असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला. त्यामुळे भूमापक निरुत्तर झाले. या प्रकल्पाला शेतकर्‍यांची जमीन जात असल्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत. गेल्या दहा वर्षात नैनाचा तालुक्यात काहीही झाले नसल्याने शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. स्वतःच्या जमिनीवर शेतकरी काहीही करू शकत नाही तसेच जमिनीची विक्रीदेखील शकत नाही. त्यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. येथील शेतकर्‍यांनी नैना नको म्हणून 8 हजार 400 अर्ज दिलेले आहेत. या भूमापक अधिकार्‍यांसमोर शेतकर्‍यांनी नैना नको हाच पाढा वाचला.

Exit mobile version