गेलच्या पाईपलाईनला शेतकर्‍यांचा विरोध

केंद्रीय मंत्र्यांना निवेदन सादर

। उरण । वार्ताहर ।

गेल (इंडिया) लिमिटेड कंपनीच्या उरण ते उसर प्रोपेन गॅस पाईपलाईनचे काम सुरु असून, या पाईपलाईनला उरण परिसरातील शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकर्‍यांच्यावतीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना करण्यात आली आहे.

या संदर्भात खोपटे येथील कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी शेतकर्‍यांसमवेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत निवेदन सादर केले. त्याची त्वरेने दखल घेत कपिल पाटील यांनी उपस्थित शेतकर्‍यांच्या समक्ष उपजिल्हाधिकारी अश्‍विनी पाटील यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आणि प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच मोबदल्याबाबत गेल कंपनीने शेतकर्‍यांशी चर्चा करावी, असे निर्देशही त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले आहेत. तसे पत्रही गेलला पाठविण्यात आले आहे.

गेल कंपनीची गॅस पाईपलाईन ही शेतकर्‍यांच्या शेताच्या मधोमध जाते. तसेच ही जागा फक्त वापरासाठी संपादित होणार आहे. त्यामुळे जागाही जाणार व मोबदलाही कमी मिळणार असल्यामुळे सोन्याचा भाव असणार्‍या खोपटे, धसाखोशी, कोप्रोली, मोठीजुई, कळंबुसरे, केळवणे, दिघाटी, साई गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल भावाने गेल (इंडिया) लिमिटेड कंपनीच्या घशात जाणार आहेत. हे नुकसान होऊ नये, म्हणून ठाकूर यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. कपिल पाटील यांनीही शेतकर्‍यांच्या हितासाठी पुढाकार घेतला असून, त्यांच्यासोबत राहणार असल्याचे शिष्टमंडळाशी चर्चा करताना स्पष्ट केले.

यावेळी ही पाईपलाईन रद्द करण्यात यावी किंवा तिचा मार्ग बदलण्यात यावा, अशी भूमिका उपस्थित शेतकर्‍यांनी घेतली. त्याचवेळी 3(1) च्या आलेल्या नोटीसींचे, शेतकर्‍यांच्या हरकतीचे फॉर्म गेल इंडिया कंपनीला बेलापूर येथील कार्यालयात शेतकर्‍यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी महेश भगत, चांगदेव ठाकूर व मनोहर म्हात्रे हे उपस्थित होते.

गेलच्या गॅस पाईपलाईनमुळे उरण, पनवेलमधील गावातील शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. एकतर ती लाईनच रद्द करावी. अन्यथा मार्ग बदलावा. पण प्रत्येकवेळी विकासासाठी शेतकर्‍यांचा नाहक बळी देऊ नये.

गोरख ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते, खोपटे
Exit mobile version