खराब हवामानामुळे शेतकरी हवालदिल

। रसायनी । वार्ताहर ।

रसायनी परिसरात सततच्या खराब हवामानाचा फटका खरिपाच्या हंगामात भाताच्या पिकाला बसू लागला आहे. हवामानात अचानक बदल होत असल्याने भात पिकावर करपा आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिसरात मागील आठवड्यात तीन दिवस मध्यम स्वरूपाचा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकाला दिलासा मिळाला आहे. परिसरात गेल्या चार दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत.

आकाश ढगाळले असते, क्वचित पावसाची एखादी सर येते. हवामानाच्या या लहरीपणामुळे भाताच्या पिकात किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पिकाला दमदार पावसाची गरज असल्याचे कृषिमित्र सुदाम कडपे यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी सततच्या खराब हवामानामुळे भात लावणीनंतर काही दिवसांनी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन वेळा खत टाकले, तसेच औषध फवारणी केली. मात्र त्यानंतरही पिकावर करपा रोग पडल्याचे स्थानिक शेतकरी मोतीराम माळी यांनी सांगितले; तर परिसरातील वडगाव, आपटे, चावणे, गुळसुंदे, वासांबे मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याही चिंतेत भर पडली आहे.

Exit mobile version