सहनशीलतेचा अंत नका पाहू;  शेतकर्‍यांचे रेल रोको आंदोलन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी 18 ऑक्टोबरला रेल रोको करण्यात येणार आहे. भारतीय किसान युनियनचे नेते गुरनाम सिंग चढूनी यांनी शेतकर्‍यांना रेल्वे स्थानकांवर जाऊन रेल्वे रोखण्याचे आदेश दिले आहेत. तीन कृषी कायदे रद्द करणे आणि एमएसपीवर पिकांची खरेदी करणे, तसेच लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेत केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक करणे अशा मागण्या घेऊन शेतकर्‍यांनी या आंदोलन पुकारलं आहे.
दिल्लीच्या वेगवेळ्या सीमांवर शेतकर्‍यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता वर्षभरापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. त्यामुळे आता शेतकरी नेते चढुनी यांनी सरकारला इशारा दिला आहे. सहनशीलतेची देखील एक सीमा असते, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अशा भावना रोहतकमध्ये आयोजिय किसान महापंचायतीमध्ये गुरनाम सिंग चढुनी यांनी व्यक्त केल्या.
उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलक शेतकरी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. हरियाणाचे मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या विरोधात काठ्या उगारायला सांगतात आणि लखीमपूरमध्ये ही घटना होते, हा योगायोग नाही असंही यावेळी चढुनी यावेळी म्हणाले.
दरम्यान, शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला आता वर्षभरापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवर सर्वोच्च न्यायालयाने तुर्तास स्थगिती आणलेली आहे. मात्र हे कायदे रद्द करा ही मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून हे रेल रोको आंदोलन केलं जाणार आहे.

Exit mobile version